पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यात 8 जवान शहीद; तीन दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 05:05 PM2017-08-26T17:05:11+5:302017-08-26T20:25:37+5:30
दक्षिण काश्मीरमधील पुलवामाध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एकुण आठ जवान शहीद झाल्याची माहिती मिळते आहे.
श्रीनगर, दि. 26- दक्षिण काश्मीरमधील पुलवामाध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एकुण आठ जवान शहीद झाल्याची माहिती मिळते आहे. यामधील ४ जण जम्मू काश्मीर पोलीस दलातील असून ४ जण सीआरपीएफचे आहेत. तर पाच जवान जखमी झाल्याची माहिती समोर येते आहे. पहाटेच्या सुमारास काही दहशतवाद्यांनी जिल्हा पोलीस वसाहतीवर हल्ला केला. यानंतर दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांकडून ऑपरेशन सुरु झालं. यामध्ये तीन दहशतवादी ठार झाले. सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरू असल्याची माहिती मिळते आहे.
दहशतवादी जिल्हा पोलीस वसाहतीमध्ये लपून बसल्यावर सुरक्षा दलांकडून दहशतवाद्यांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन सुरु करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. यामध्ये सुरक्षा दलाचे एकूण ८ दहशतवादी जखमी झाले. ‘इमारतीच्या आतून दोन दहशतवादी गोळीबार करत आहेत,’ अशी माहिती दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पोलिसांकडून देण्यात आली. यानंतर पोलिसांच्या कुटुंबीयांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.
UPDATE: Eight security personnel killed in #PulwamaEncounter, 5 injured, says police.
— Press Trust of India (@PTI_News) August 26, 2017
लष्कराकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस लाईमधील सगळ्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आलं आहे. लेफ्टनंट जनरल जे.एस संधू यांच्या माहितीनुसार, पोलीस लाईनमध्ये असणाऱ्या सगळ्या कुटुंबांना बाहेर काढण्यात आलं आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये अद्यापही चकमक सुरू आहे.
भरती होणा-यांपेक्षा ठार होणा-या दहशतवाद्यांची संख्या जास्त
जम्मू काश्मीरमध्ये गुप्तचर यंत्रणांकडून मिळत असलेल्या ठोस माहितीच्या आधारे दहशतवाद्यांविरोधात कारवाई करत दहशतवादाचं कंबरडं मोडण्यात यश मिळालं आहे. परिस्थिती तर अशी झाली आहे की, या वर्षात जितके दहशतवादी भरती झालेले नाहीत त्यापेक्षा जास्त दहशतवादी ठार करण्यात आले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी जम्मू काश्मीरात एकूण 71 दहशतवाद्यांची भरती करण्यात आली होती. मात्र लष्कराने कारवाई करत एकूण 132 दहशतवाद्यांना ठार केलं आहे.
यावर्षी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून 78 दहशतवाद्यांनी घुसखोरी केली आहे. गतवर्षी 2016 मध्ये हा आकडा एकूण 123 होता. दहशतवाद्यांची ही आकडेवारी पाहता काश्मीर खो-यातील दहशतवाद्यांच्या घुसखोरीचं प्रमाणही कमी झाल्याचंच दिसत आहे.
यावर्षी लष्कराने कारवाई करत ज्या 132 दहशतवाद्यांना ठार केलं, त्यामधील 74 विदेशी तर 58 स्थानिक दहशतवादी होते. यामधील 14 लष्कर-ए-तोयबा, हिजबूल मुजाहिद्दीन आणि अल-बद्रचे टॉप कमांडर होते. राज्य पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने केलेल्या संयुक्त कारवायांमध्ये मोठं यश हाती लागत असल्याचं दिसत आहे.