गोव्यात अजूनही पाच हजार विदेशी नागरिक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 05:38 AM2020-04-18T05:38:08+5:302020-04-18T05:38:16+5:30
एकही जागा हॉटस्पॉट नाही; २३९ विदेशी मायदेशी परतले
पणजी : गोव्यात अजूनही साडेचार ते पाच हजार विदेशी नागरिक आहेत. गोव्याहून २३ खास विमानांद्वारे ४ हजार २३९ विदेशी पर्यटक त्यांच्या मायदेशी परतले तरी, अजून पाच हजार विदेशी गोव्यात आहेत, अशी माहिती विदेशातील दूतावासांनी गोवा सरकारच्या यंत्रणेला दिली.
मुख्य सचिव परिमल रे यांच्या अध्यक्षतेखालील समितीची शुक्रवारी बैठक झाली. त्यावेळी ही माहिती समोर आली. पर्यटन हंगामावेळी गोव्याच्या पर्यटनाचा लाभ घेण्यासाठी हे विदेशी नागरिक आले होते. तथापि, कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने ते इथेच अडकून पडले. अनेक रशियन्सही गोव्यात आहेत. गोव्यात कोरोनाविषयक स्थिती कशी आहे, मदत कार्य कसे सुरू आहे, लॉकडाऊनची अंमलबजावणी कशी सुरू आहे व येत्या दि. २० नंतर कोणत्या सेवा किंवा व्यवसाय गोव्यात सुरू करता येतील याविषयीही बैठकीत चर्चा झाली. आतापर्यंत जे सात रुग्ण आढळले, त्यापैकी सहा जण विदेशातूनच आले होते. सातपैकी सहा रुग्ण उपचारानंतर बरे झाले. आता फक्त एकच बाधित रुग्ण इस्पितळात उपचार घेत आहे. अबकारी आयुक्तांच्या मते गोव्यात मद्यनिर्मिती उद्योगांनी एकूण १ लाख, ५८ हजार लिटर सॅनिटायझरची निर्मिती केली.
केंद्रीय आरोग्य व कटुंब कल्याण मंत्रलयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार गोव्यात कोरोनाचा एकही हॉटस्पॉट नाही. दोन्ही जिल्हे नॉन हॉटस्पॉट गटात येतात. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्रालयाच्या यादीनुसार गोव्यात येत्या दि.२० नंतर अतिरिक्त व्यावसायिक उपक्रम सुरू करता येतात, असे आरोग्य सचिवांनी बैठकीत सांगितले. गोव्यासाठी एक हजार थर्मल गन्सची खरेदी केली जाणार आहे. राज्याच्या सीमांवर यापुढे जलदगतीने चाचणी करण्याचे काम केले जाणार आहे.