पाच हजार भारतीयांना बनवले ‘सायबर गुलाम’, ५०० कोटींची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2024 05:47 AM2024-03-30T05:47:28+5:302024-03-30T05:47:47+5:30
या सायबर गुन्ह्यांतून गेल्या सहा महिन्यांत भारतीय नागरिकांना सुमारे ५०० कोटी रुपयांना लुबाडण्यात आले आहे.
नवी दिल्ली : कंबोडिया या देशामध्ये सायबर गुलामगिरीत अडकलेल्या पाच हजारहून अधिक भारतीयांना सायबर गुन्हे करण्यास भाग पाडले जात आहे. त्यांच्याकडून भारतातील लोकांचीच फसवणूक करण्यात येते. या सायबर गुन्ह्यांतून गेल्या सहा महिन्यांत भारतीय नागरिकांना सुमारे ५०० कोटी रुपयांना लुबाडण्यात आले आहे.
कंबोडियातील सायबर गुलामगिरीत अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, इंडिया सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर व सुरक्षा तज्ज्ञांशी सल्लामसलत केली आहे. कंबोडियामध्ये भारतीयांची मानवी तस्करी झाली आहे. त्यांना त्या सापळ्यातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. विदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचे सूत्रांनी सांगितले.
लाखो भारतीयांची अशी केली जाते फसवणूक
भारतातील लोकांशी कंबोडियातून इंटरनेट, सोशल मीडियाद्वारे संपर्क डेटिंग ॲपवर महिला असल्याचे भासवून समोरच्या व्यक्तीशी चॅटिंग केले जाते. त्यानंतर त्या व्यक्तीला क्रिप्टोकरन्सी व्यवहारांमध्ये सहभागी होण्यासाठी राजी केले जाते. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांसाठी तयार केलेल्या ऑनलाइन ॲपमध्ये भारतातील व्यक्तीला पैसे गुंतविण्यास सांगितले जाते. एकदा हा आर्थिक व्यवहार झाला की गुंतवणूकदाराला लक्षात येते की, आपली फसवणूक झाली आहे. कारण, हे ॲप बनावट असतात.
...तर दिला जातो इलेक्ट्रिक शॉक
विदेशात नोकरी मिळवून देण्याचे एजंटांकडून आमिष दाखविले जाते. त्यानंतर भारतातील लोकांना विदेशात नेऊन तिथे त्यांची फसवणूक केली जाते. नोकरीच्या आशेने गेलेल्या भारतीयांना तिथे सायबर गुन्हे करण्यास भाग पाडण्यात आले. भारतातील लोकांना लक्ष्य करण्यास सांगितले जाते.कंपन्या पासपोर्ट घेतात आणि नंतर त्यांना घोटाळे करण्यासाठी १२ तास कामाला जुंपतात. असे काम करण्यास कोणी नकार दिल्यास त्याचा शारीरिक छळ केला जातो. त्यांना इलेक्ट्रिक शॉक दिला जातो.