'Vande Bharat' Expresses: गोवा-मुंबईसह पाच ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस, पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 08:25 AM2023-06-28T08:25:41+5:302023-06-28T08:25:51+5:30
'Vande Bharat' Expresses: पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे पोहोचले आणि त्यांनी देशाच्या विविध भागांतील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
- अभिलाष खांडेकर
भोपाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे पोहोचले आणि त्यांनी देशाच्या विविध भागांतील महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
पंतप्रधान मोदी भोपाळच्या राणी कमलापती रेल्वेस्थानकावर पोहोचले. तेथून त्यांनी दोन वंदे भारत एक्स्प्रेसला प्रत्यक्ष, तर ३ वंदे भारत एक्स्प्रेसला ऑनलाइन माध्यमातून हिरवा झेंडा दाखवला. यामध्ये राणी कमलापती (भोपाळ)-जबलपूर वंदे भारत एक्स्प्रेस, खजुराहो-भोपाळ-इंदूर वंदे भारत एक्स्प्रेस, मडगाव (गोवा)-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस, धारवाड-बंगळुरू वंदे भारत एक्स्प्रेस व हातिया-पाटणा वंदे भारत एक्स्प्रेसचा समावेश आहे. भर पावसात हजारो भोपाळवासी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वाट पाहत होते.
मुंबईत जंगी स्वागत
- मडगाव-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे मंगळवारी जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि पर्यटनात अग्रेसर असलेल्या गोवा यांदरम्यान सुरू झालेल्या वंदे भारतमुळे पर्यटनाचा शाश्वत विकास होण्यास आणखी मदत होईल.
- राज्यात रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी केंद्राने १३ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससह १२३ रेल्वे स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. राज्यातील बुलेट ट्रेनसह अन्य रेल्वे प्रकल्पांच्या पूर्णत्वासाठी केंद्राच्या साहाय्याने प्रयत्न सुरू आहेत. बुलेट ट्रेनकरिता भूसंपादनाचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.