पाच वर्षांत देश १००% साक्षर होईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 01:20 AM2017-08-07T01:20:53+5:302017-08-07T01:20:58+5:30
पाच वर्षात म्हणजे २०२२ पर्यंत भारत १०० टक्के साक्षर होईल, असा आत्मविश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. तर, खासगी आणि सरकारी विद्यालये एकमेकांशी स्पर्धा करतील, असेही ते म्हणाले.
जयपूर : पाच वर्षात म्हणजे २०२२ पर्यंत भारत १०० टक्के साक्षर होईल, असा आत्मविश्वास केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. तर, खासगी आणि सरकारी विद्यालये एकमेकांशी स्पर्धा करतील, असेही ते म्हणाले.
दुबईस्थित जीईएमएस एज्यूकेशन ग्रुपसोबत राजस्थान सरकारने आयोजित केलेल्या शिक्षण महोत्सवात ते बोलत होते. जावडेकर म्हणाले की, स्वातंत्र्यानंतर फक्त १८ टक्के असणारी साक्षरता आता ८० टक्क्यांवर पोहोचली आहे. १०० टक्के साक्षरतेचे लक्ष्य ठेऊन शाळेतील प्रशिक्षित विद्यार्थी आपल्या अशिक्षित आई -वडीलांना आणि आजी-आजोबांना शिक्षित करतील. राजस्थान सरकारने केलेल्या शैक्षणिक सुधारणांचे आणि सरकारी शाळांमध्ये वाढलेल्या स्पर्धात्मक गुणवत्तेचे त्यांनी कौतुक केले.
ते म्हणाले की, सरकारी शाळेत शैक्षणिक गुणवत्तेच्या सुधारणांसाठी जे प्रयत्न करण्यात येत आहेत ते या शाळा आणि खासगी शाळा यांच्यात स्पर्धात्मक वातावरण निर्माण करण्यात महत्वाचे ठरतील. संयुक्त अरब अमिरातचे शिक्षण मंत्री शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान म्हणाले की, शिक्षणात नवे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत ते देशाच्या विकासासाठी महत्वाचे ठरणार आहेत.