पाच वर्षांत रेल्वेत आमूलाग्र परिवर्तन पाहायला मिळेल
By admin | Published: November 14, 2016 01:27 AM2016-11-14T01:27:29+5:302016-11-14T01:27:29+5:30
दरवर्षी ८00 कोटींहून अधिक व रोज २.३0 कोटी प्रवाशांची वाहतूक करणारी भारतीय रेल्वे जगातील सर्वात स्वस्त सेवा पुरवणारी यंत्रणा आहे.
नवी दिल्ली : दरवर्षी ८00 कोटींहून अधिक व रोज २.३0 कोटी प्रवाशांची वाहतूक करणारी भारतीय रेल्वे जगातील सर्वात स्वस्त सेवा पुरवणारी यंत्रणा आहे. प्रत्येक प्रवाशाच्या १ किलोमीटरच्या प्रवासासाठी रेल्वेला ७४ पैसे खर्च येतो, पण भाड्यापोटी त्याच्याकडून अवघे ३७ पैसे मिळतात. तोटा सहन करूनही रेल्वे २४ तास करते आहे. त्यामुळे रेल्वेचे पुनरूज्जीवन करण्यात येणार असून, येत्या ५ वर्षात त्यात आमुलाग्र परिवर्तन झाल्याचे पाहायला मिळेल, असे उद्गार रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अरुणेंद्र कुमार मित्तल यांनी काढले.
मित्तल म्हणाले, दिल्ली-मुंबई डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर डिसेंबर २0१९ पर्यंत पूर्ण होईल. दिल्ली-हावडा कॉरिडॉरही लवकर सुरू व्हावा असे प्रयत्न आहेत. या दोन्ही मार्गांवरून मालवाहतूक बंद झाली, की प्रवासी गाड्यांची गती वाढेल. राजधानी, शताब्दीसारख्या ट्रेन्स ताशी १६0 कि.मी. वेगाने, मेल एक्सप्रेस ताशी ८0 कि.मी. वेगाने, पॅसेंजर व मालवाहतुकीच्या ट्रेन्स ताशी ५0 कि.मी. वेगाने धावू लागतील आणि प्रवासाचा वेळ वाचेल.
आधुनिकीकरणासाठी आम्ही जीवन वीमा महामंडळाकडूनदीड लाख कोटी रुपयांचे कर्ज उचलले. बाजारपेठेत रोखे व बाँडसच्या माध्यमातून पैसे उभे केले. काही प्रकल्पांना आंतरराष्ट्रीय वित्तिय संस्थांचीही मदत होत आहे. रेल्वे वाहतुकीसाठी दरवर्षी १२ हजार कोटी रुपयांची वीज व १८ हजार कोटी रुपयांचे डिझेल असे ३0 हजार कोटी लागतात. त्यात १0 टक्के बचत करण्याचे उद्दिष्ट आहे. वीजनिर्मिती केंद्राशी वाटाघाटी करून स्वस्त दरात वीज मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे मित्तल म्हणाले.
ईशान्येकडील राज्यांत याच वर्षापासून ब्रॉडगेज रेल्वे वाहतूक
सुरू होणार आहे. पाच वर्षांत रेल्वेचे शून्य अपघात, अचून वेळापत्रक, मागेल त्याला प्रवासाचे आरक्षण, गाड्यांमध्ये बायो टॉयलेटमध्ये सुरू, गार्डरहित रेल्वे, क्रॉसिंगचे उच्चाटन असे महत्वाचे निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)