झंडा उंचा रहे हमारा! त्यांनी पुराच्या पाण्यात उभे राहत दिली तिरंग्याला सलामी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2017 04:45 PM2017-08-15T16:45:43+5:302017-08-15T16:48:58+5:30
आज देशभरात अगदी उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. एकीकडे राजधानी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह दिसून आला, तर दुसरीकडे पूर्वोत्तर राज्यात पुराने वेढा घातला असताना पुराच्या पाण्यात उभे राहत नागरिकांनी झेंडावंदनाचा कार्यक्रम करत राष्ट्रध्वजाला उत्साहात सलामी दिली.
नवी दिल्ली, 15 - आज देशभरात अगदी उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा होत आहे. एकीकडे राजधानी दिल्लीत स्वातंत्र्य दिनाचा उत्साह दिसून आला, तर दुसरीकडे पूर्वोत्तर राज्यात पुराने वेढा घातला असताना पुराच्या पाण्यात उभे राहत नागरिकांनी झेंडावंदनाचा कार्यक्रम करत राष्ट्रध्वजाला उत्साहात सलामी दिली.
पुराने वेढलेल्या आसाममध्ये सगळीकडे पाणी साचलेले असल्याने थेट छतावरच ध्यजवंदनाचा कार्यक्रम करण्यात आला. एवढेच नाही तर उपस्थितांनी कंबरेएवढ्या पाण्यात उभे राहून राष्ट्रध्वजाला सलामी दिली. आसाममधील मारीगांव जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये पावसाचे पाणी भरले होते. पण ध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी शाळेतील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी आपली सुरक्षा धोक्यात घातली. काही ठिकाणी शाळेच्या छतावर ध्वजवंदन करण्यात आले. तर काही ठिकाणी होडीमध्ये बसून शाळेत येत मुलांनी ध्वजवंदनाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.
याशिवाय अजून एक छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे छायाचित्र आसाममधील धुबगी जिल्ह्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे. या छायाचित्रात दोन विद्यार्थी आणि चार अन्य व्यक्ती पाण्यात उभे राहून ध्वजाला सलामी देताना दिसत आहे.
तर पुराने थैमान घातलेला पश्चिम बंगालमधील अशी काही छायाचित्रे प्रसारित झाली आहेत ज्यांना पाहून प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने फुलून येईल. बंगालमधील पुरुलिया येथे 103 वर्षांचे स्वातंत्र्य सैनिक विजय कुमार दत्ता यांनी ध्वजवंदन केले. आसाम आणि बंगालप्रमाणेचे पूरग्रस्त बिहारमध्येही स्वातंत्र्य दिनाचा उत्साह दिसून आला.
Assam: Various schools unfurled the tricolor in flood-hit Morigaon district #IndependenceDayIndiapic.twitter.com/S0RlgYja7g
— ANI (@ANI) August 15, 2017
दरम्यान, आज लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात पुरामुळे प्रभावित झालेल्या नागरिकांचा उल्लेख केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर ध्वजवंदन करुन सलग चौथ्यांदा देशवासियांना संबोधित केले. देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वातंत्र्य दिनाच्या या शुभप्रसंगी देशवासियांना कोटी-कोटी शुभेच्छा. संपूर्ण देश आज स्वातंत्र्य दिनासोबत जन्माष्टमीचाही उत्सव साजरा करत आहे. सुदर्शन चक्राधारी मोहनपासून ते चरखाधारी मोहनपर्यंतचा वारसा आपल्याला लाभला आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, देशाच्या गौरवासाठी हजारो लोकांनी बलिदान दिलं, यातना-दु:ख सोसले, त्या सर्व वीरांना सव्वाकोटी देशवासियांतर्फे नमन करतो, असेही उद्गार यावेळी पंतप्रधान मोदींनी काढले.