मोबाईलच्या फ्लॅश लाइटमध्ये जन्मला 'वंशाचा दिवा'
By admin | Published: October 6, 2016 11:52 PM2016-10-06T23:52:46+5:302016-10-06T23:55:23+5:30
थ्री इडिएट्स चित्रपटातला प्रसिद्ध किस्सा गुरगावमध्ये एका सरकारी रुग्णालयात घडल्याचा प्रकार उजेडात आला
ऑनलाइन लोकमत
गुडगाव, दि. 6 - थ्री इडिएट्स चित्रपटातला प्रसिद्ध किस्सा गुडगावमध्ये एका सरकारी रुग्णालयात घडल्याचा प्रकार उजेडात आला आहे. रुग्णालयाची बत्ती गुल झाल्यानं एका महिलेची मोबाईलच्या फ्लॅश लाइटमध्ये डिलिव्हरी करायची वेळी नर्सवर आली. अगोदर तीन मुली असलेल्या या कुटुंबाला आता मोबाईलच्या फ्लॅश लाइटमध्ये वंशाचा दिवा मिळाला आहे.
मिलेनियम सिटीमधल्या सरकारी रुग्णालयात एका महिलेला संध्याकाळच्या सुमारास प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरही ड्युटीवर हजर नव्हते. नर्स आणि वॉर्डबॉयच फक्त रुग्णालयात होते. त्याच दरम्यान रुग्णालयातली बत्ती अचानक गुल झाली. रुग्णालयात पसरलेल्या काळोखात उजेड होता तो फक्त मेणबत्त्यांचा. अचानक त्याच वेळी महिलेला जोरजोरात प्रसूती वेदना होऊ लागल्या. मात्र डॉक्टर ड्युटीवर हजर नसल्यानं नर्स प्रसूती कक्षात दाखल झाल्या. मात्र फक्त मेणबत्त्यांच्या प्रकाशात महिलंचं बाळंतपण करणं अशक्य असल्याचं उपस्थित नर्सच्या वेळीच लक्षात आल्यानं त्यांनी चक्क मोबाईलच्या फ्लॅश लाइटमध्ये त्या महिलेचं बाळंतपण केलं. आणि त्या महिलेनं मुलाला जन्म दिला.
थ्री इडिएट्स चित्रपटातला कित्ता या रुग्णालयात पुन्हा गिरवला गेल्यानं अनेकांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. या घटनेची सर्व हकीकत त्या गर्भवती महिलेचा पती कपिल कुमार यांनी सांगितली आहे. मात्र या प्रकारामुळे सरकारी रुग्णालयांतील गलथानपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.