Flashback 2018: उद्योगजगतातील हे नावाजलेले चेहरे ठरले 'ठग्स ऑफ हिंदोस्तान'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2018 03:35 PM2018-12-24T15:35:23+5:302018-12-24T15:36:37+5:30
भारतीय उद्योगजगतात नीरव मोदी, मेहुल चोकसी, नितीन, चेतन संदेसरा सारख्या व्यापाऱ्यांना घोटाळे करून संपूर्ण उद्योगजगतासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.
नवी दिल्ली- भारतात अनेक दिग्गज व्यावसायिक आहेत. परंतु त्यातले काही व्यावसायिक भारतात घोटाळे करून परदेशात परागंदा झाले आहेत. भारतीय उद्योगजगतात नीरव मोदी, मेहुल चोकसी, नितीन, चेतन संदेसरा सारख्या व्यापाऱ्यांना घोटाळे करून संपूर्ण उद्योगजगतासमोर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. इतकेच नव्हे, तर त्याचा परिणाम राजकीय क्षेत्रातही दिसत होता. बँकांना अब्जोंचा गंडा घालणे, मनी लाँड्रिंगमध्ये फरार असलेला व्यावसायिक विजय माल्या, हिरे व्यापारी चोकसी आणि नीरव मोदी हे देशातली राजकारण्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे विषय ठरले होते.
माल्यानं दावा केला आहे की, त्यानं 2016मध्ये भारत सोडण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींची भेट घेतली होती. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वादळ निर्माण झालं होतं. परंतु जेटलींनी त्यांचे दावा फेटाळून लावले होते. विशेष म्हणजे लंडनच्या न्यायालयानं माल्याच्या प्रत्यार्पणाला मंजुरी दिली आहे. परंतु माल्यानं याविरोधात न्यायालयात अर्ज केले आहेत. घोटाळे करून परागंदा झालेले किती उद्योगपती घोटाळेबाज ठरतात आणि त्यांना भारतात आणलं जाणार का, हे येत्या काळातच समजणार आहे. गुजरातमधल्या औषध निर्माण करणारी कंपनी स्टर्लिंग बॉयोटेकचे समूह प्रवर्तक नितीन आणि चेतन संदेसरा यांचंही नाव एका घोटाळ्यात समोर आलं होतं. हे दोघेही बँकांना 5 हजार कोटींचा चुना लावणे आणि उत्पन्न दाखवण्यास असमर्थ ठरल्याप्रकरणी आरोपी आहे. सध्या तरी दोघेही फरार आहेत.
उद्योगजगतात 2018मध्ये फोर्टिस आणि रेनबॅक्सीचे माजी संचालक सिंह बंधूही चर्चेत होते. दोन्ही भावांमधले वाद मारहाणीपर्यंत गेले होते. दोघांनीही एकमेकांवर मारहाण आणि व्यवसायाला बुडवण्याचा आरोप केला होता. तर दुसरीकडे सायरस मिस्त्री यांनाही टाटा सन्सनं अध्यक्षपदावरून दूर केलं होतं. त्यानंतर टाटा आणि मिस्त्री यांच्यातील वाद अद्यापही संपुष्टात आलेला नाही. हा वाद आता राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण(एनसीएलटी)च्या मुंबई पीठाच्या बाहेर येऊन राष्ट्रीय कंपनी विधी अपिलीय न्यायाधिकर(एनसीएलएटी)पर्यंत जाऊन पोहोचला आहे. तसेच या सर्व वादादरम्यान काही मोठे करारही करण्यात आले आहेत. यात वॉलमार्टद्वारे फ्लिपकार्टचं अधिग्रहण, हिंदुस्थान युनिलिव्हरचं ग्लॅक्सो स्मिथक्लाइन(जीएसके)बरोबर विलीनीकरणासारखे निर्णयांचा समावेश आहे.