Flashback 2020 : मोठा दिलासा! कोरोनाच्या संकटात "या" पॉझिटिव्ह घटना राहतील कायम लक्षात
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2020 11:41 AM2020-12-31T11:41:07+5:302020-12-31T13:41:07+5:30
Flashback 2020 : २०२० मध्ये सगळेच काही वाईट घडले असे नाही. चांगल्या गोष्टींचीही नोंद यंदाच्या वर्षात झाली. या सर्वोच्च पाच पॉझिटिव्ह गोष्टींचा घेतलेला आढावा...
नवी दिल्ली - २०२० या वर्षात सर्वाधिक चर्चा झाली ती कोरोनाची. मात्र, २०२० मध्ये सगळेच काही वाईट घडले असे नाही. चांगल्या गोष्टींचीही नोंद यंदाच्या वर्षात झाली. या सर्वोच्च पाच पॉझिटिव्ह गोष्टींचा घेतलेला आढावा...
अर्थव्यवस्थेत पाचव्या स्थानावर घेतली झेप
- फेब्रुवारीमध्ये प्रकाशित झालेल्या ‘वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू’ अहवालानुसार भारत जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरला.
- यादीमध्ये आधी अमेरिका, चीन, जपान, जर्मनी, फ्रान्स आणि ब्रिटन अशी क्रमवारी होती.
- मात्र, भारताने फ्रान्स आणि ब्रिटनला मागे टाकले.
- ब्रिटन आणि फ्रान्सचा जीडीपी अनुक्रमे २.८३ आणि २.७१ ट्रिलियन डॉलर एवढा होता.
लसीच्या नावाने तीन विक्रम प्रस्थापित केले
- भारतीय कृषी संशोधन परिषदेने फेब्रुवारीमध्ये क्लासिकल स्वाइन फीव्हरवर नवी लस तयार केली
- ही लस स्वस्त, परिणामकारक असल्याचे सिद्ध
- जुलैमध्ये भारतीय संशोधकांनी न्यूमोनियावर परिणामकारक ठरेल, अशी लस तयार केली
- लसीला औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिली
- कोरोनावरील प्रभावी ठरू शकेल, अशी लस भारत बायोटेकने तयार केली असून तिला अद्याप मंजुरी मिळावयाची आहे.
सर्वाधिक प्रथिने असलेल्या गव्हाच्या वाणाची निर्मिती
- पुणेस्थित केंद्रीय आगरकर संशोधन संस्थेने मार्च महिन्यात गव्हाचे विशेष वाण विकसित केले.
- ‘एमसीएम-४०२८’असे या वाणाचे नाव असून, त्यात १४.७ टक्के अधिक प्रथिने आहेत.
- १०२ दिवसांत याचे पीक हाती येते, त्यामुळे उत्पादकांनाही चांगला फायदा होतो.
- कुपोषणाला आळा घालण्यासाठी युनिसेफच्या ‘व्हिजन २०२०’ उपक्रमांतर्गत या गव्हाच्या वाणाची निर्मिती करण्यात आली. याची जगभर चर्चा झाली होती.
बालमृत्यूदर आला अर्ध्यावर, कुपोषण घटल्याने फायदा
- सप्टेंबर महिन्यात प्रकाशित झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार १९९० ते २०१९ या कालावधीत बालमृत्यूदर घटला आहे.
- १९९० मध्ये बालमृत्यूचे प्रमाण १ कोटी २५ लाख होते, जे २०१९ मध्ये ५२ लाख झाले.
- देशात पाच वर्षांहून कमी वयाच्या ६८ टक्के मुलांच्या मृत्यूचे कारण माता व नवजात अर्भकाचे कुपोषण हे होते.
चांद्रयान-२ने चंद्रावरील खड्ड्याचे छायाचित्र टिपले
- चांद्रयान-२ने ऑगस्ट महिन्यात चंद्रावरील खड्ड्याचे छायाचित्र टिपले
- त्यास भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राचे जनक विक्रम साराभाई यांचे नाव देण्यात आले.
- यंदाचे वर्ष साराभाई यांचे जन्मशताब्दी वर्ष होते.
- चांद्रयानाला वर्ष पूर्ण झाले असून, सात वर्षांपर्यंत चंद्राची प्रदक्षिणा घालू शकेल एवढे इंधन त्यात आहे.