बसखाली अडकून मृतदेहाची ७० किमीपर्यंत फरफट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 01:31 AM2018-02-05T01:31:48+5:302018-02-05T01:31:58+5:30
तमिळनाडूमधील कुन्नूर येथून बंगळुरू येथे आलेल्या कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसखालील चॅसिसमध्ये अडकून एका तरुणाचा मृतदेह ७० किमी फरफटत आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघड झाला.
बंगळुरू: तमिळनाडूमधील कुन्नूर येथून बंगळुरू येथे आलेल्या कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसखालील चॅसिसमध्ये अडकून एका तरुणाचा मृतदेह ७० किमी फरफटत आल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी उघड झाला. प्रवाशांना झोपण्याची सोय असलेली ही बस शनिवारी पहाटे अडीचच्या सुमारास बंगळुरू येथे पोहोचली. शहरात दोन-तीन स्टॉपवर प्रवाशांना उतरवून बस शेवटी बसडेपोमध्ये आणून उभी केली गेली. ती धुण्यासाठी नेली असता, तिच्या खाली एक मृतदेह अडकले असल्याचे आढळून आले.
हे प्रेत ३० ते ४० वर्षांच्या पुरुषाचे आहे, पण त्याची ओळख पटली नाही. पोलिसांना कळवून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले गेले. या घटनेच्या संदर्भात बसचालक मोहिनुद्दिन यास अटक झाली आहे. निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत होणे व पुरावा नष्ट करणे असे त्याच्यावर आरोप आहेत. येताना वाटेत चेन्नापटना येथे बसखाली काही तरी आल्याचे जाणवले व जोरदार धक्का बसला, पण अपरात्र असल्याने आपण बस थांबवून पाहिले नाही, असे मोहिनुद्दिनने सांगितले. (वृत्तसंस्था)
>इतक्या लांब फरपटत?
चेन्नापटना हे ठिकाण बंगळुरूपासून ७० किमी अंतरावर आहे. तेथे बसखाली एखादी व्यक्ती अपघातात मृत्युमुखी पडली असावी, असे गृहित धरले, तरी तो मृतदेह बसला अडकून एवढ्या लांबपर्यंत फरफटत यावे, याविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.