अरे देवा! माशांमुळे मोडले संसार, नवऱ्यांना सोडून माहेरी गेल्या बायका; तरुणांच्या लग्नाचे झाले वांदे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2022 12:35 PM2022-12-07T12:35:33+5:302022-12-07T12:36:51+5:30
माशांच्या त्रासाला वैतागून लग्न झालेल्या अनेक महिला या माहेरी राहायला गेल्या आहेत. अनेक दाम्पत्याचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये एक अजब घटना समोर आली आहे. हरदोई जिल्ह्यातील काही गावात माशांमुळे लोक हैराण झालं आहेत. या ठिकाणी जवळपास 5 हजारांपेक्षा जास्त माशा आहेत. लोकांच्या आयुष्यावर याचा परिणाम होत असून येथे गावकऱ्याचं खाणंपिणं, रात्री झोपणंही अवघड झालं आहे. घरांच्या छतांवरही माशाच माशा आहे. माशांपासून मुक्ती मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी अनेक ठिकाणी तक्रारी दिल्या. आंदोलनं केली. पण आतापर्यंत कोणीच दखल घेतली नाही.
स्थानिक प्रशासन प्रदूषण विभागाची जबाबदारी असल्याचं सांगून आपले हात वर करत आहे. माशांच्या त्रासाला वैतागून लग्न झालेल्या अनेक महिला या माहेरी राहायला गेल्या आहेत. अनेक दाम्पत्याचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सागवान पोल्ट्री फार्मच्या निर्मितीनंतर ही समस्या उद्भवत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. अहिरोरीचील कुईया गावात 2014 साली केंद्र सरकारच्या वित्त पोषित कुक्कुट योजनेअंतर्गत सागवान पोल्ट्री फार्मची स्थापना झाली. 2017 सालापासून इथं उत्पादन सुरू झालं.
सध्या दर दिवशी दीड लाख कोंबड्यांच्या अंड्यांचं उत्पादन होतं. पोल्ट्री फार्मची क्षमता वाढली तशी ग्रामस्थांची समस्या वाढली. पोल्ट्री फार्मपासून 300 मीटर दूर बढ़ईनपुरवा गावातील ग्रामस्थ माशांना वैतागले आहेत. या गावातील ग्रामस्थ श्रवण कुमार वर्मा यांच्या नेतृत्वात ग्रामस्थ आंदोलन करत आहेत. श्रवण कुमार वर्मा म्हणाले, बढ़ईनपुरवा, डही, झाला पुरवा, नया गाव, देवरिया आणि एकघरा गावात माशांचा सर्वात जास्त त्रास आहे. गेल्या वर्षी गावात 7 लग्न झाली. त्यापैकी 4 तरुणी आणि 3 तरुण आहेत. यावर्षी एकही लग्न झालं नाही. ना कुणाच्या लग्नाची बोलणी सुरू आहे.
माशांच्या त्रासामुळे कोणीच आपली मुलगी या गावात द्यायला तयार नाही. पोल्ट्री फार्मचे मालक दलवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी फार्म सुरू केलं तेव्हा प्रदूषण विभागाची एनओसी घेतली होती. लोकवस्तीपासून दूर पोल्ट्री फार्म तयार केलं. पण त्यानंतर काही लोकांनी पोल्ट्री फार्मजवळ आपली घरं बांधली. माशांना कंट्रोल करण्याची सर्व व्यवस्था आहे. कित्येक वेळा तपासणीही झाली, त्यात काहीच कमतरता दिसून आली नाही. माशांमुळे संसार उद्ध्वस्त होत नाही आहेत. याची कारणं दुसरी असावीत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"