इराक, इराणच्या हवाई हद्दीतून उड्डाण बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 06:25 AM2020-01-09T06:25:47+5:302020-01-09T06:26:14+5:30
इराण, इराक, ओमानच्या हवाई हद्दीतून अमेरिकेच्या विमानांनी उड्डाण बंद केले आहे.
नवी दिल्ली : इराण, इराक, ओमानच्या हवाई हद्दीतून अमेरिकेच्या विमानांनी उड्डाण बंद केले आहे. आता एअर इंडियानेही तसाच निर्णय घेतला आहे. इराणच्या हवाई हद्दीतून अमेरिका, युरोपला जाणाऱ्या आपल्या विमानांचे हवाई मार्ग एअर इंडियाने बदलले आहेत. इराणचे कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांना अमेरिकेने ठार केल्यानंतर दोन्ही देशांतील तणाव वाढला असून, त्यामुळे ही दक्षता घेण्यात आली आहे.
या बदलांमुळे दिल्ली व मुंबईहून अमेरिका, युरोपला जाणा-या विमानांच्या प्रवासाचा कालावधी अनुक्रमे २० मिनिटे व ३० ते ४० मिनिटांनी वाढणार आहे. एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस या विमानांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. इराण, इराक, ओमान, पर्शियन आखातातील प्रदेशावरून उड्डाण करताना दक्षता बाळगावी, अशी सूचना केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याने भारतीय विमान कंपन्यांना केली होती. त्यानंतर एअर इंडियाने हा निर्णय घेतला. इराणच्या तेहरानजवळून उड्डाण करीत असलेले युक्रेनचे एक विमान बुधवारी कोसळून १७० हून अधिक प्रवासी ठार झाले. त्या पार्श्वभूमीवर भारताने आपल्या विमान कंपन्यांना इशारा दिला होता. भारतीय नागरिकांनी आवश्यकता नसेल तर सध्या इराकमध्ये जाणे टाळावे, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे.
इराणी लष्कराने अमेरिकेच्या इराकमधील दोन लष्करी छावण्यांवर क्षेपणास्त्र हल्ला केला होता. इराकमधील स्थिती बिघडलेली असली तरी बगदाद येथील भारतीय राजदूतावास, एर्बिल येथील वकिलातीचे काम पूर्वीप्रमाणेच सुरू राहील, असेही भारताने स्पष्ट केले आहे. इराकमध्ये जाताना पाकिस्तानी नागरिकांनी दक्षता बाळगावी, अशी सूचना इम्रान खान सरकारने केली आहे. जे पाकिस्तानी नागरिक सध्या इराकमध्ये आहेत त्यांनी बगदादमधील पाकिस्तानी राजदूतावासाच्या नित्यसंपर्कात राहावे, असेही त्यांना सांगण्यात आले आहे.
>शांततेसाठी मध्यस्थी करावी : इराण
कमांडर जनरल कासीम सुलेमानी यांची अमेरिकेने हत्या केल्यानंतर निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी भारताने मध्यस्थी केल्यास त्याचे आम्ही स्वागतच करू, असे इराणचे भारतातील राजदूत अली चेगेनी यांनी सांगितले. इराणला युद्ध नको आहे. मध्य-पूर्वेतील देशांत शांती, समृद्धी नांदावी अशीच इराणची इच्छा आहे, असेही ते म्हणाले.
अमेरिकेचे स्वत:च्या विमानांवर निर्बंध
इराक, इराण, ओमान व पर्शियन आखातातील हवाई हद्दीतून अमेरिकेच्या विमानांनी उड्डाण करण्यास ट्रम्प सरकारने बंदी घातली आहे. मध्य-पूर्वेतील वाढलेल्या लष्करी कारवाया लक्षात घेता अमेरिकी विमानांना त्या भागातून उड्डाण करताना मोठा धोका संभवतो. त्यामुळेच त्यांना मनाई करण्यात आल्याचे अमेरिकेच्या हवाई वाहतूक खात्याने (एफएए) म्हटले आहे.