फ्रान्समध्ये अडवलेले विमान भारतात पोहोचले, ३०३ प्रवासी गेले होते, २७६ परतले; राहिलेले २७ भारतीय कुठे आहेत?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 08:15 AM2023-12-26T08:15:47+5:302023-12-26T08:21:27+5:30
फ्रान्सने अडवलेले रोमानियन विमान मुंबईत उतरले आहे. त्यात २७६ प्रवासी होते. हे विमान दुबईहून निकाराग्वाला जात होते, तेव्हा त्यात ३०३ प्रवासी होते.
मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समध्ये अडवलेले रोमानियन विमान भारतात पोहोचले आहे. या विमानात २७६ प्रवासी होते. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास विमान मुंबईत पोहोचले. हे विमान सोमवारी दुपारी २.३० वाजता निघाले होते. हे विमान दुबईहून निकाराग्वाला जात होते, तेव्हा त्यात ३०३ प्रवासी होते.
पण जेव्हा हे विमान भारतात परतले तेव्हा त्यात फक्त २७६ प्रवासी होते. यातील २७ प्रवासी कुठे गेले असा प्रश्न अनेकांना पडला आहे. गुरूवारी या विमानाला मानवी तस्करीच्या संशयावरून पॅरिसपासून १५० किमी पूर्वेला वेट्री विमानतळावर थांबवण्यात आले होते. या विमानात २१ महिन्यांच्या मुलासह ११ अल्पवयीनांचाही समावेश होता. फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी रविवारी विमानाला पुन्हा उड्डाण करण्याची परवानगी दिली.
लेह, लडाख हादरले! पहाटे ४.५ रिश्टर तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के
२ भारतीय कुठे आहेत?
सोमवारी या विमानाने २७६ प्रवाशांसह भारताकडे उड्डाण केले. उर्वरित २७ प्रवाशांपैकी २५ प्रवाशांनी फ्रान्समध्ये राहण्यासाठी अर्ज केला आहे. यामध्ये दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. अन्य दोन प्रवाशांना न्यायालयात न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले, तेथून त्यांची सुटका करण्यात आली. सोमवारी हे विमान भारतात रवाना झाल्यानंतर फ्रान्समधील भारतीय दूतावासाने फ्रेंच अधिकाऱ्यांचे आभार मानले.
फ्रान्समधील भारतीय दूतावासाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले तसेच प्रवाशांच्या सुरक्षित परतीची खात्री करण्यासाठी घटनास्थळी उपस्थित असलेल्या दूतावासाच्या टीमसोबत काम केल्याबद्दल धन्यवाद. भारतातील एजन्सींनाही धन्यवाद.
मानवी तस्करीसाठी २० वर्षांची शिक्षा
मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रेंच अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दोन जणांना ताब्यात घेतले. शनिवारी त्यांच्या कोठडीत ४८ तासांची वाढ करण्यात आली. दरम्यान, विमान कंपनीने तस्करीत सहभाग असल्याचा नकार दिला. फ्रान्समध्ये मानवी तस्करीसाठी २० वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे.