पूरप्रभावित तामिळनाडूस १,००० कोटी
By admin | Published: December 4, 2015 03:07 AM2015-12-04T03:07:41+5:302015-12-04T03:07:41+5:30
चेन्नईत उद्भवलेल्या पूरस्थितीची गुरुवारी मुख्यमंत्री जे. जयललितांसमवेत पाहणी करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी एक हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तात्काळ मदत जाहीर केली.
- पंतप्रधानांची घोषणा
चेन्नई : चेन्नईत उद्भवलेल्या पूरस्थितीची गुरुवारी मुख्यमंत्री जे. जयललितांसमवेत पाहणी करणाऱ्या पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी राज्यासाठी एक हजार कोटी रुपयांची अतिरिक्त तात्काळ मदत जाहीर केली.
तामिळनाडूत गेल्या १०० वर्षांचा विक्रम मोडीत काढणाऱ्या अभूतपूर्व पावसाने २६९ बळी घेतले आहेत. चेन्नईच्या उपनगरांच्या हालाला पारावार राहिलेला नाही. जनजीवन अजूनही ठप्प आहे. वाहतुकीच्या सर्व यंत्रणांचा बोजवारा उडालेला असताना मदतकार्यासाठी लष्कराच्या मदतीस आलेल्या राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची कुमक दुपटीने वाढविण्यात आली आहे.
गेल्या रात्रीपासून पावसाने किंचित विश्रांती घेतली असली तरी नजीकच्या जलाशयातून प्रचंड प्रमाणात सोडलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती कायम आहे. या परिस्थितीबाबत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी काळजी व सहसंवेदना व्यक्त केली आहे.
विदर्भातील
विद्यार्थी अडकले
खामगाव व अकोला येथील सेंट अॅन्स शाळेतील ६ ते १० वीच्या विद्यार्थ्यांची केरळ येथे गेलेली शैक्षणिक सहल अतिवृष्टीमुळे चेन्नईपासून ४० किमी अंतरावर तिरुवेल्लूर येथे अडकली आहे. यात खामगाव येथील २७ आणि अकोला येथील ३७ अशा एकूण ६४ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी सुखरुप असून, त्यांच्यासोबत चार शिक्षिका आहेत.