आसाम-मेघालयात जलप्रलय; २९ ठार
By admin | Published: September 24, 2014 03:29 AM2014-09-24T03:29:29+5:302014-09-24T03:29:29+5:30
ईशान्य भारतातील मेघालय व आसाम राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरूअसलेल्या मुसळधार पावसाने कमीत कमी २९ जणांचा जीव गेला
गुवाहाटी/शिलाँग : ईशान्य भारतातील मेघालय व आसाम राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरूअसलेल्या मुसळधार पावसाने कमीत कमी २९ जणांचा जीव गेला. मृतांमध्ये मेघालयातील २१ व आसाममधील ८ जणांचा समावेश आहे.
आसाममध्ये गेल्या तीन दिवसांपासून सुरूअसलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाच्या घटनांत आठ जण मृत्युमुखी पडले. हवाई दलाचे हेलिकॉप्टर, सैन्य दल, एनडीआरएफ व एसडीआरएफ यांच्या मदतीने बचावकार्य हाती घेण्यात आले आहे. राज्यात एनडीआरएफच्या ११ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. जिल्हा उपायुक्त प्रीतम सैकिया यांनी सांगितले की, गोपालपाडात पूरस्थिती सर्वाधिक गंभीर असून येथे पाच जण दगावले. आसाम आणि शेजारील मेघालयामध्ये मुसळधार पावसाने ५० हजारांहून अधिक जणांचे जीवन विस्कळीत झाले आहे.
मंगळवारी पावसाने काहीशी उघडीप देताच मदत व बचाव अभियान सुरू करण्यात आले. सोमवारी सकाळी पाऊस बंद झाल्याने गुवाहाटीतील स्थितीमध्येही सुधारणा होत आहे.