पुराचा हाहाकार
By admin | Published: August 3, 2015 11:42 PM2015-08-03T23:42:08+5:302015-08-03T23:42:08+5:30
गेल्या ४८ तासांतील मुसळधार पावसामुळे पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, मणिपूर, ओडिशा, गुजरात आणि राजस्थान या पाच राज्यांत पुराने थैमान घातले
नवी दिल्ली : गेल्या ४८ तासांतील मुसळधार पावसामुळे पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, मणिपूर, ओडिशा, गुजरात आणि राजस्थान या पाच राज्यांत पुराने थैमान घातले असतानाच पश्चिम बंगालमध्ये स्थिती गंभीर बनली आहे. पश्चिम बंगालमधील १२ जिल्हे जलमय झाले असून सुमारे ३२ लाख लोक प्रभावित झाले आहेत. तिकडे जम्मू काश्मिरात ढगफुटीमुळे लेहमधील साबू नामक गावाला चहुबाजंूना पुराचा वेढा पडल्याने गावातील शेकडो लोक अडकून पडले आहेत. यात काही विदेशी पर्यटक असल्याचेही कळते. साबू गाव लेह विमानतळापासून ७ किमी दूर मनाली-लेह महामार्गावर स्थित आहे. पाऊस आणि पूरबळींची संख्या १०० वर गेली आहे.
पुरामुळे सर्वाधिक प्रभावित पश्चिम बंगालमध्ये लष्करास पाचारण करण्यात आले आहे. १२ जिल्ह्णांतील ३७ लाख लोक प्रभावित झाले असून हावडा, हुबळी, बर्धवान, दक्षिण २४ परगणा आणि पश्चिम मिदनापूर जिल्ह्यात पुरस्थिती गंभीर आहे. अनेक नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत.
राज्यांत पूर व पावसाचे आतापर्यंत ६९ बळी गेले आहेत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी राज्यात पूर आणि वादळातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाखांची नुकसानभरपाई जाहीर केली. अपंगांना प्रत्येकी २ लाख तर जखमींना ६० हजार रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली. (लोकमत न्यूज नेटवर्क)