गुजरातमध्ये पुराचा हाहाकार; मध्य प्रदेश, महाराष्ट्रात हाय अलर्ट जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 07:06 PM2024-08-26T19:06:22+5:302024-08-26T19:06:33+5:30
अहमदाबादच्या अनेक भागात सात फुटांवर पाणी भरले आहे. गुजरातच्या २३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशात पुन्हा एकदा पावसाने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. हवामान विभागाने मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरातसह महाराष्ट्रातही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अशातच गुजरातमधील अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अहमदाबादमध्ये पहाटे तीन वाजल्यापासून पाऊस सुरु असून शहरातही पाणी भरले आहे.
अहमदाबादच्या अनेक भागात सात फुटांवर पाणी भरले आहे. गुजरातच्या २३ जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. याचबरोबर मध्य प्रदेशच्या नीचम, उज्जैन, मंदसौर, रतलामसह ८ जिल्ह्यांत पुढील २४ तासांत पूर येण्याचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानमध्ये ५ जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि ५ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
गुजरातमधील मोरबी येथे मुसळधार पावसामुळे धवना गावात तलाव भरून वाहू लागला होता. या ठिकाणी लोकांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली पाण्यात वाहून गेली, यामध्ये १७ जण वाहून गेले असून १० जणांना एनडीआरएफने वाचविले आहे, तर उर्वरितांचा शोध सुरु आहे.
पाण्याची पातळी वाढल्यामुळे 72 जलाशयांना हाय अलर्ट तर 15 जलाशयांना नियमित सतर्कतेवर ठेवण्यात आले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी अधिकाऱ्यांना सखल भागातील लोकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी नेण्याचे निर्देश दिले आहेत. अतिवृष्टीमुळे सर्वाधिक प्रभावित झालेल्या जिल्ह्यांमध्ये दक्षिण गुजरातमधील वलसाड, तापी, नवसारी, सुरत, नर्मदा आणि पंचमहाल यांचा समावेश आहे.