गुजरातमध्ये पूरसदृश्य परिस्थिती, जनजीवन विस्कळीत; गाड्या वाहून गेल्या, एकमेकांना आदळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 11:41 AM2023-07-23T11:41:33+5:302023-07-23T11:45:49+5:30

लोकांना अहमदाबाद विमानतळावर प्रवास करण्यापूर्वी एअरलाइन्सशी संपर्क साधण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

Flood-like situation in Gujarat, life disrupted; Cars drifted, crashed into each other | गुजरातमध्ये पूरसदृश्य परिस्थिती, जनजीवन विस्कळीत; गाड्या वाहून गेल्या, एकमेकांना आदळल्या

गुजरातमध्ये पूरसदृश्य परिस्थिती, जनजीवन विस्कळीत; गाड्या वाहून गेल्या, एकमेकांना आदळल्या

googlenewsNext

अहमदाबाद आणि जुनागडसह गुजरातमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, अहमदाबाद-जुनागडमध्ये पाऊस थांबल्याने परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. परंतु रस्त्यांवर पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात आहे. याशिवाय लोकांना अहमदाबाद विमानतळावर प्रवास करण्यापूर्वी एअरलाइन्सशी संपर्क साधण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

अहमदाबाद विमानतळावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते आणि लोकांना पार्किंगबाबत अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. या संदर्भात अहमदाबाद विमानतळावरील प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधून फ्लाइट तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच प्रवाशांना पार्किंग टाळण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. अहमदाबादमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्येही पूर आला असून, त्याचा व्हिडिओही समोर आला आहे. शनिवारी रात्री सिव्हिल हॉस्पिटलच्या ट्रॉमा वॉर्डमध्ये पाणी साचले होते, मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आली आहे.

जुनागडमध्ये परिस्थिती अशी झाली होती की, लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करावे लागले. पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले होते. १९८३ नंतर प्रथमच येथे इतक्या पावसाची नोंद झाली आहे. शहरात बांधलेल्या बेसमेंट पार्किंगमध्येही पाणी साचले होते. पाण्याचा प्रवाह इतका जोरात होता की अनेक वाहने त्यात बुडाली. एवढेच नाही तर लिफ्ट आणि पायऱ्यांमधूनही पाणी येऊ लागले. रायजीबाग म्हणजेच जुनागडचा पॉश एरिया येथे पावसामुळे महागडी वाहनेही खेळण्यांसारखी वाहू लागली. त्याचवेळी पुराच्या पाण्यात म्हशीही अडकल्या होत्या. आता रस्त्यांवरून पाणी ओसरले असले तरी परिस्थिती अजूनही बिकट आहे. एकमेकांवर वाहनांचे ढीग पडले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गुजरातमधील बहुतांश भागात पावसामुळे अडचणी निर्माण झाल्या होत्या. द्वारकेत नाले अडवले गेले आणि पाणी साचले. बाजारपेठांमध्ये दोन ते तीन फूट पाणी साचले. दुसरीकडे, नवसारी येथे सकाळी १० ते दुपारी १२ या दोन तासांत ९ इंच पाऊस झाला. दोन तासांच्या मुसळधार पावसाने नवसारी आणि विजलपूर शहरातील अनेक भाग पाण्याखाली गेले. शहरात जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर पाणी साचले आहे. जुनाठाणा परिसरातील गॅस एजन्सीच्या गोदामाचे गेट पाण्याच्या प्रवाहामुळे उघडले. यानंतर येथे ठेवलेले गॅस सिलिंडर पाण्यात वाहून गेले. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

Web Title: Flood-like situation in Gujarat, life disrupted; Cars drifted, crashed into each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.