धार्मिक हरिद्वारमध्ये दारूचा महापूर! तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल १०७ पेट्या दारू जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 06:53 AM2022-02-10T06:53:05+5:302022-02-10T06:54:18+5:30
समस्त हिंदू श्रद्धाळू ज्या ठिकाणी गंगेत स्नान करून पापक्षालनासाठी येतात, त्या हरिद्वारमध्येच जिंकण्यासाठी दारूची नदी प्रवाहित करण्याची राजकीय पक्षांची तयारी बघून, मतदारांना उबग आला आहे.
रवी टाले -
हरिद्वार : उत्तराखंड विधानसभेच्या ७० जागांपैकी सर्वाधिक ११ जागा असलेल्या हरिद्वार जिल्ह्यातील निवडणुकीत दारूचा जणू पूर आला आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून तब्बल १०७ पेट्या दारू जप्त केली.
विष्णू आणि शिव या हिंदू धर्मातील दोन प्रमुख देवतांच्या तीर्थयात्रांचे प्रवेशद्वार असल्यामुळे हरिद्वार असे ज्या स्थानाचे नाममाहात्म्य आहे, समस्त हिंदू श्रद्धाळू ज्या ठिकाणी गंगेत स्नान करून पापक्षालनासाठी येतात, त्या हरिद्वारमध्येच जिंकण्यासाठी दारूची नदी प्रवाहित करण्याची राजकीय पक्षांची तयारी बघून, मतदारांना उबग आला आहे.
हरिद्वारचे जिल्हाधिकारी विनय शंकर पांडेय यांनी मतदारांना प्रभावित करण्यासाठी दारूचा वापर होण्याची शंका असल्यामुळे अबकारी विभागाला सजग केले आहे. त्यामुळे अबकारी विभागाने जिल्ह्यातील सर्व दारू दुकानांवर क्लोज सर्किट (सीसी) कॅमेऱ्यांच्या साहाय्याने नजर ठेवली आहे. त्यासाठी पाच कर्मचाऱ्यांचा चमू २४ तास सज्ज असतो. आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत तब्बल ४.३६ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ, १.९५ कोटी रुपयांची दारू आणि २.४८ कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे.
मदन कौशिक, हरीश रावत यांची प्रतिष्ठा पणाला!
- मदन कौशिक आणि काँग्रेसचे बडे नेते हरीश रावत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कौशिक हरिद्वार मतदारसंघातून सलग पाचवा विजय मिळविण्यासाठी रिंगणात उतरले आहेत, तर रावत यांची कन्या अनुपमा हरिद्वार ग्रामीणमधून लढत लढत आहे.
- गत निवडणुकीत रावत मुख्यमंत्री असताना पराभूत झाले होते. त्यामुळे अनुपमा रावत यांच्यापुढे पित्याची प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान आहे. स्वत: हरीश रावत यावेळी कुमाऊं विभागातील लालकुआं मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत.