अरुणाचलमध्ये पूरस्थिती गंभीर
By admin | Published: August 23, 2015 03:35 AM2015-08-23T03:35:58+5:302015-08-23T03:35:58+5:30
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील मुख्य नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अरुणाचल प्रदेशच्या नामसाई आणि लोहित जिल्ह्यात गंभीर
इटानगर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील मुख्य नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अरुणाचल प्रदेशच्या नामसाई आणि लोहित जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे.
अधिकृत माहितीनुसार नोआ दिहिंग आणि तिच्या उपनद्या ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे नामसाई जिल्ह्यातील खालच्या भागात प्रामुख्याने लेकांग क्षेत्रात न्यू सिलाटू, धरमपूर, लेकांग गोहन गाव, दिरक गिरी, रंजलीबील, राजाबील आणि फिलोबारीमध्ये पूर आला आहे. पुरामुळे नामसाई आणि तेजूदरम्यान संपर्क तुटला आहे. लोहित, कमलँग, बेरेंग, तेंगापानी आणि जेंगथूसह सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
नदीकाठच्या गावांना दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. चांगलिआंग, धिवाजीनगर, खोरलिआंग, दुरालिआंग, दांगलत, सनपुरा आदी गावांना पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. चांगलिआंग या गावात तर मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. बलिजान भागातील एक लघु प्रकल्प फुटल्यामुळे अनेक भागात पाणी शिरले आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशसह हरियाणा, पंजाब राज्यात आज हलक्या ते मध्यम सरी कोसळल्याचे वृत्त आहे. (वृत्तसंस्था)