उत्तरेत हाहाकार, महाराष्ट्रात चिंता; उत्तर पश्चिमेत उत्तम, विदर्भ-मराठवाडा तहानलेलाच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2023 07:06 AM2023-07-13T07:06:41+5:302023-07-13T07:07:00+5:30
दिल्लीतून वाहणाऱ्या यमुना नदीने आज २०७.७१ मीटरची पातळी गाठून ४५ वर्षे जुना विक्रम इतिहासजमा केला
नवी दिल्ली : उत्तराखंड, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरयाणात अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे. गत चार दिवसांत देशातील वेगवेगळ्या राज्यांत १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. हवामान खात्याने सांगितले की, पुढील दोन दिवस उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडू शकतो. उत्तर भारतात पावसाने जोरदार हजेरी लावलेली असताना महाराष्ट्रातील निम्म्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शेतकरी चिंतेत आहे.
यमुना नदीला ऐतिहासिक पूर, ४५ वर्षांचा विक्रम इतिहासजमा
दिल्लीतून वाहणाऱ्या यमुना नदीने आज २०७.७१ मीटरची पातळी गाठून ४५ वर्षे जुना विक्रम इतिहासजमा केला. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि हरयाणात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे हरयाणातील हथिनी कुंड धरणातून वेगाने सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून बऱ्यापैकी कोरड्या असलेल्या राजधानी दिल्लीत ऐतिहासिक पुराचे संकट ओढवले.
उत्तर पश्चिमेत उत्तम, विदर्भ-मराठवाडा तहानलेलाच
देशातील उत्तर पश्चिम भागात चांगला म्हणजे ६२% पाऊस झाला आहे. दक्षिण भागात आतापर्यंत २३%, तर मध्य भारतात केवळ ४% पाऊस झाला आहे. पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात १९ टक्के पाऊस झाला आहे.
हिमाचलमध्ये २००० पर्यटकांची सुटका
हिमाचलच्या कासोलमध्ये अडकलेल्या किमान २,००० पर्यटकांना बाहेर काढण्यात आले आहे. हिमाचलमध्ये शिमला-किन्नौर मार्गावर एक वाहन सतलज नदीत पडून एकाच कुटुंबातील चार सदस्य बेपत्ता झाले आहेत. पंजाबच्या फरीदकोट जिल्ह्यात घराचे छत कोसळून एका दाम्पत्यासह त्यांच्या मुलाचा मृत्यू झाला. पंजाबच्या पटियाला, रूपनगर, मोगा, लुधियाना, मोहाली आदी भागांतून १० हजारांवर लोकांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. उत्तराखंडमध्ये पौडी जिल्ह्यात एक कार पूर आलेल्या नदीत कोसळून त्यातील पाचपैकी तीन व्यक्तींचा मृत्यू झाला.