Assam Flood : पावसाचा हाहाकार! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; 27 जिल्ह्यांतील तब्बल 7 लाखांहून अधिक लोकांना फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 01:00 PM2022-05-20T13:00:35+5:302022-05-20T13:06:19+5:30

Assam Flood : राज्यातील 27 जिल्हे आणि जवळपास 7.18 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे.

flood situation worsens in assam more than 7 lakh people affected in 27 districts | Assam Flood : पावसाचा हाहाकार! आसाममध्ये पूरस्थिती गंभीर; 27 जिल्ह्यांतील तब्बल 7 लाखांहून अधिक लोकांना फटका

फोटो - सोशल मीडिया

googlenewsNext

आसाममध्ये पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. गुरुवारी पूरस्थिती आणखी गंभीर झाली आणि यामध्ये आणखी एकाचा मृत्यू झाला. राज्यातील 27 जिल्हे आणि जवळपास 7.18 लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दैनिक पूर अहवालानुसार, नागाव जिल्ह्यातील कामपूर महसूल क्षेत्रात बुडून एकाचा मृत्यू झाला. याशिवाय कामपूरमध्ये आणखी दोन जण बेपत्ता आहेत, असं त्यात म्हटलं आहे. यासह राज्यात पूर आणि भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या दहा झाली आहे, असं अहवालात म्हटलं आहे.

पुरामुळे राज्यात 7,17, 500 हून अधिक लोक बाधित झाल्याचं प्राधिकरणाने म्हटलं आहे. बजली, बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, बोनगाईगाव, कछार, दरांग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगड, दिमा हसाओ, गोलपारा, हैलाकांडी, होजई, कामरूप, कामरूप मेट्रोपॉलिटन, कार्बी आंगलाँग वेस्ट, करीमगंज, कोकराझार, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, नलबाडी, सोनितपूर आणि उदलगुरी जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला आहे.

नगावमध्ये सर्वाधिक 3.31 लाख लोक बाधित झाले आहेत. त्यापाठोपाठ कछार (1.6 लाख) आणि होजाली (97,300) यांचा क्रमांक लागतो. बुधवारपर्यंत राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये पुरामुळे 6.62 लाख लोक बाधित झाले होते. प्राधिकरणाने सांगितलं की, सध्या 1790 गावं पाण्यात बुडाली असून संपूर्ण राज्यात 63,970.62 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालं आहे. त्यात असे म्हटले आहे की, अधिकारी 14 जिल्ह्यांमध्ये 359 मदत शिबिरे आणि वितरण केंद्रे चालवत आहेत. जिथे 80,298 लोकांना आश्रय दिला आहे. यामध्ये 12,855 मुलांचा समावेश आहे.

एका बुलेटिनमध्ये म्हटलं आहे की लष्कर, निमलष्करी दल, NDRF, SDRF, नागरी प्रशासन, प्रशिक्षित स्वयंसेवक, अग्निशमन, आपत्कालीन सेवा आणि स्थानिक लोकांनी 7,334 लोकांना विविध पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यासाठी बोटी आणि हेलिकॉप्टरचा वापर केला. अधिकाऱ्यांनी 7,077.56 क्विंटल तांदूळ, डाळी आणि मीठ, 6,020.90 लीटर मोहरीचे तेल, 2,218.28 क्विंटल चारा आणि इतर पूर मदत सामग्रीचे वाटप केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: flood situation worsens in assam more than 7 lakh people affected in 27 districts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.