दिल्ली-हरियाणामध्ये पुराचा धोका, कुल्लूमध्ये हजारो पर्यटक अडकले; चारधाम यात्रा पुन्हा खंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 12:51 PM2023-07-12T12:51:42+5:302023-07-12T12:52:23+5:30
राजस्थानच्या वाळवंटी राज्यापासून ते डोंगराळ राज्यांपर्यंत, गंगा, यमुना आणि बियाससह सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत.
नवी दिल्ली: उत्तर भारतात मुसळधार पावसामुळं महापुरासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. देशाची राजधानी दिल्ली, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. पुरामुळं अनेक भाग पाण्याखाली गेले, असून लोकांना घर सोडून इतर ठिकाणी हलवण्यात येत आहे.
राजस्थानच्या वाळवंटी राज्यापासून ते डोंगराळ राज्यांपर्यंत, गंगा, यमुना आणि बियाससह सर्व प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत. अनेकांच्या शेतांमध्ये पाणी शिरले आहे. हजारो हेक्टरवरील पिकं नष्ट झाली आहेत. डोंगरावर पावसाचा कहर आहे. हिमाचलच्या कुल्लू पर्यटन स्थळांमध्ये मनाली, मणिकर्णा आणि बंजारमध्ये १७,००० पर्यटक अडकले आहेत. चार धाम यात्राही विस्कळीत झाली आहे.
गेल्या २४ तासांत आणखी १६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी ८ मृत्यू उत्तराखंडमध्ये तर चार मृत्यू यूपीमध्ये झाले आहेत. हिमाचलमध्ये तीन दिवसांत ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-श्रीनगर महामार्ग, मनाली-लेह, मनाली-चंदीगड राष्ट्रीय महामार्गासह १५०० हून अधिक रस्ते भूस्खलनामुळे बंद झाले आहेत. हथिनीकुंड बॅरेजमधून ३.५९ लाख क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने दिल्लीतील यमुनेचे पाणी आणखी वाढणार आहे.
हरियाणा आणि पंजाबमध्ये तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कोट्यवधींच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दोन्ही राज्यांमध्ये अनेक घरे पाण्याखाली गेली असून पिकांचे नुकसान झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. रुपनगर, पटियाला, मोहाली, अंबाला आणि पंचकुला यासह बाधित जिल्ह्यांमध्ये मदतीसाठी केंद्र उभारण्यात आली आहेत. पंजाबमधील सर्वाधिक प्रभावित रुपनगर जिल्ह्यात एनडीआरएफच्या पाच टीम तैनात करण्यात आल्या आहेत.