बंगळुरूमध्ये पुराने हाहाकार! ट्रॅक्टर, बुलडोझरवर बसून आयटी कर्मचारी ऑफिसात
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 09:04 AM2022-09-07T09:04:42+5:302022-09-07T09:07:57+5:30
बंगळुरूमध्ये दाेन दिवसांपासून वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक ठिकाणी वीज पुरवठा ठप्प आहे.
बंगळुरू : काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळघार पावसामुळे कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये जनजीवन विस्कळीत झाले असून, वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी आहे. त्यामुळे अनेकांनी चक्क ट्रॅक्टर आणि बुलडाेझरवर बसून कार्यालयाची वाट धरली. तर विजेच्या खांबाला स्पर्श झाल्यानंतर एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बंगळुरूमध्येच घडली. तर हवामान खात्याने कर्नाटकसह आंध्र प्रदेश आणि केरळमध्ये तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
बंगळुरूमध्ये दाेन दिवसांपासून वाहतुकीचे तीन तेरा वाजले आहेत. अनेक ठिकाणी वीज पुरवठा ठप्प आहे. तर बाेटींमधून अशा परिस्थितीत आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी भन्नाट शक्कल लढविली. ट्रॅक्टर ट्राॅलीमध्ये बसून अनेक कर्मचारी कार्यालयात जात आहेत. त्यासाठी ते प्रत्येकी ५० रुपये माेजत आहेत. तर काही जण चक्क बुलडाेझरवर बसून जलमय रस्त्यांवरून मार्ग काढताना दिसले. मात्र या पूरस्थितीमुळे आयटी कंपन्यांचे सुमारे २५० काेटी रुपयांचे नुकसान झाले आहे. (वृत्तसंस्था)
व्हाईटफील्ड भागात तरुणीचा मृत्यू
व्हाईटफील्ड भागात अखिला नावाच्या तरुणीचा मृत्यू झाला. जलमय झालेल्या रस्त्यावर दुचाकी स्लीप झाली हाेती. त्यामुळे आधार घेण्यासाठी तिने विजेच्या खांबाचा आधार घेतला. मात्र, त्यात विद्युत प्रवाह असल्यामुळे तिचा मृत्यू झाला.
केरळमध्ये दाेन जण गेले वाहून
केरळमध्येही मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी तिरुअनंतपूरमजवळ एका धबधब्यामध्ये अचानक आलेल्या पुरात दाेन पर्यटक वाहून गेले. त्यात एका लहान मुलाचाही समावेश आहे. कावेरी नदीची पाणी पातळी वाढल्यामुळे किनाऱ्यालगतच्या गावांना इशारा दिला आहे. तिरुअनंतपूरम, पथ्थनपीथिटा, इडुक्की इत्यादी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
केवळ दोन विभागांमध्ये समस्या : मुख्यमंत्री बोम्मई
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरूतील परिस्थितीसाठी यापूर्वीच्या काँग्रेस सरकारला दाेषी ठरविले. अतिवृष्टी आणि जलसाठे ओव्हरफ्लो भरल्यामुळे काही भागात पाणी भरले. केवळ दोन विभागांमध्येच अशी स्थिती असून चित्र मात्र पूर्ण शहर तुंबल्याचे रंगविणत येत असल्याचे बोम्मई म्हणाले.
‘अनअकॅडमी’च्या संस्थापकांनाही ट्रॅक्टरचा आधार -
या महापुरात प्रसिद्ध ‘स्टार्टअप्स’चे संस्थापक किंवा सीईओंसाठी देखील ट्रॅक्टर मोठा आधार ठरला आहे. ‘अनअकॅडमी’चे संस्थापक गौरव मुंजाळ यांची सोसायटीही पाण्याखाली गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना आणि पाळीव कुत्र्यालाही ट्रॅक्टरच्या सहाय्याने वाचवावे लागले.
आलिशान कार सोडून लोक ट्रॅक्टरवर -
परिस्थिती किती वाईट आहे, याचा अंदाज यावरूनच लावता येईल की, अतिश्रीमंताच्या सोसायटीतही लेक्सस, बेंटले, बीएमडब्ल्यू अशा आलिशान कार पाण्यात बुडलेल्या दिसत आहेत. तर, लोक जीव वाचवण्यासाठी फक्त जीवनावश्यक वस्तू ट्रॅक्टरवर ठेवून तेथून बाहेर पडत आहेत. कोट्यवधींच्या महागड्या कारही त्यांच्या कामी आल्या नाहीत, अखेर ट्रॅक्टरनेच तारले.