आसाममध्ये १७ जिल्ह्यांत पुराचा कहर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 04:12 AM2020-07-07T04:12:34+5:302020-07-07T04:12:45+5:30
आसामच्या विविध भागांत आणखी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ८ लाखांहून अधिक पाळीव प्राणी आणि एवढ्याच कोंबड्यांनाही या पुराचा फटका बसला आहे.
गुवाहाटी : आसाममध्ये १७ जिल्ह्यांत पुराचा तडाखा बसला असून ६ लाख ८० हजारांहून अधिक लोकांना याचा फटका बसला आहे. ६२ शिबिरांत ४८५२ लोकांना ठेवण्यात आले आहे.
आसामच्या विविध भागांत आणखी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ८ लाखांहून अधिक पाळीव प्राणी आणि एवढ्याच कोंबड्यांनाही या पुराचा फटका बसला आहे. अर्थात, लखीमपूर, शिवसागर, बोंगईगाव, होजई, उदलगुरी, माजुली आणि पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यात्ां पुराच्या स्थितीत सुधारणा झाली आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल आणि आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या टीम लोकांना मदत करीत आहेत. ग्रामीण भागातील लोकांना आवश्यक वस्तूंचा पुरवठाही केला जात आहे. आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा यांनी सांगितले की, आसामच्या गुवाहाटीमध्येच कोरोनाचे अधिक रुग्ण दिसून येत आहेत. राज्य सचिवालयातील कार्यालय एक आठवड्यासाठी बंद ठेवले आहेत.
व्दारकेत बुडाल्या कार
व्दारका : गुजरातच्या व्दारकामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर मोठा पूर आला असून यात निवासी भागातील काही कार बुडाल्याचे दिसत आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. एका कॉलनीमधील काही वाहने पाण्यात अर्धी बुडालेली दिसत आहेत. पुराचे पाणी इंजिनमध्येही गेले आहे. गुजरातच्या गीर, सोमनाथ, जुनागड आणि अमरेलुसह अन्य काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे.