FloorTest: बहुमत चाचणी म्हणजे काय? जाणून घ्या विधानभवनात कसं करतात बहुमत सिद्ध?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 07:37 AM2018-05-19T07:37:11+5:302018-05-19T07:38:14+5:30
राजकीय नाट्य कर्नाटकमध्ये सुरू असून नेमकं कर्नाटक कुणाचं? याबद्दलचा गुंता अजूनही सुटलेला नाही.
बंगळुरू- कर्नाटक विधानसभेच्या मतदानाचा निकाल लागल्यानंतर कर्नाटकमध्ये अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नाट्य कर्नाटकमध्ये सुरू असून नेमकं कर्नाटक कुणाचं? याबद्दलचा गुंता अजूनही सुटलेला नाही. याचं उत्तर आज मिळणार आहे. येडियुरप्पा यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असली तरी आज त्यांच्यासमोर बहुमत चाचणीचं आव्हान आहे. येडियुरप्पा यांना आज बहुमत सिद्ध करावं लागणारं आहे. काँग्रेस व जेडीएसनेही सत्ता स्थानपनेचा दावा केला आहे. त्यामुळे आज चार वाजता कर्नाटकावर नेमकी कुणाची सत्ता येईल? हे समोर येणार आहे.
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आज भाजपा, काँग्रेस व जेडीएस बहुमत चाचणीला सामोरं जाणार आहे. पण ही बहुमत चाचणी नेमकी कशी असते ? व संसदेत कशा प्रकारे सरकार स्थानप होतं? हे जाणून घेऊया.
बहुमत चाचणी म्हणजे काय?
कुठल्याही विधानसभेत जेव्हा एका पक्षाला किंवा युतीला निवडणुकीत बहुमत मिळत नाही तेव्हा राज्यपाल नियमानुसार त्या निवडणुकीतील मोठ्या पक्षाला किंवा युतीला ज्यांच्याकडे जास्त आमदारांचं समर्थन आहे अशांना सरकार स्थापन करण्याचं निमंत्रण देतात. पण जेव्हा निमंत्रित पक्षाकडे किंवा युतीकडे बहुमत नसल्याचं लक्षात आल्यावर एका मर्यादेनंतर त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगितलं जातं. बहुमत चाचणीच्या दिवशी सरकारकडून विधानभवनात विश्वासदर्शक ठराव मांडला जातो. त्यावर चर्चा केली जाते. पक्ष व विरोधी पक्षांचे नेते त्यावर मतं मांडतात.
मतदान करण्याची प्रक्रिया
विधानभवनात चर्चेनंतर अध्यक्ष किंवा हंगामी अध्यक्ष उपस्थित असलेल्या आमदारांना गुप्त किंवा ध्वनिमताच्या माध्यमातून विश्वासदर्शक ठरावावर मतदान करायला सांगतात. विश्वासदर्शक ठरावाच्या समर्थनार्थ जास्त मत मिळाली, किंवा जास्त आमदारांनी हात वर करून सहमती दर्शविली तर सरकारकडे बहुमत असल्याचं सिद्ध होतं. पण जर विरोधात मत पडली तर सरकारकडे बहुमत नसल्याचं मानलं जातं.
दरम्यान, कर्नाटक विधानसभेवर सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 112 आहे. भाजपाकडे 104 आमदारांचं संख्याबळ आहे. जर येडियुरप्पा यांनी 112 आमदारांचं समर्थन विधानभवनात दाखवलं तर येडियुरप्पाच कर्नाटकचे मुख्यमंत्री राहतील. जर तसं झालं नाही तर येडियुरप्पा यांनी राजीनामा द्यावा लागेल. दुसरीकडे, काँग्रेसचे 78 आमदार निवडून आले आहेत तर जेडीएसचे 38 आमदार आहेत त्यामुळे काँग्रेस व जेडीएसने एकत्रितपणे सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. कर्नाटक नेमकं कुणाचं? हे आज चार वाजता स्पष्ट होणार आहे.