बाप-लेकीची सोबत लढाऊ विमान भरारी; भारतीय हवाई दलातील पहिलीच अनोखी घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2022 09:20 AM2022-07-07T09:20:32+5:302022-07-07T09:20:54+5:30
फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा या २०२१मध्ये भारतीय हवाई दलात रुजू झाल्या. त्यांनी सांगितले की, माझे वडील व एअर कमोडोर संजय शर्मा यांच्याकडे पाहून मलाही पायलट होण्याची इच्छा होती.
नवी दिल्ली : फायटर पायलट असलेल्या पिता-पुत्री या दोघांनी मिळून लढाऊ विमान चालवण्याची भारतीय हवाई दलाच्या इतिहासातील पहिलीच घटना नुकतीच घडली. कर्नाटकातील बिदर येथे फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा हिने आपले वडील व एअर कमोडोर संजय शर्मा यांच्यासमवेत हवाई दलाचे हॉक-१३२ हे लढाऊ विमान उड्डाण केले.
फ्लाइंग ऑफिसर अनन्या शर्मा या २०२१मध्ये भारतीय हवाई दलात रुजू झाल्या. त्यांनी सांगितले की, माझे वडील व एअर कमोडोर संजय शर्मा यांच्याकडे पाहून मलाही पायलट होण्याची इच्छा होती. लहानपणापासूनच विमाने, हवाई दल यांचे आकर्षण होते. खूप कठीण परीक्षा उत्तीर्ण होऊन हवाई दलात प्रवेश मिळाल्याने मला अतिशय आनंद झाला. अनन्या सध्या लढाऊ विमान उडविण्याचे बिदर येथे प्रशिक्षण घेत आहेत. त्याच दरम्यान त्यांना आपले वडील संजय शर्मा यांच्यासोबत लढाऊ विमान चालवण्याची संधी मिळाली. भारतीय हवाई दलामध्ये २०१६ साली तीन महिला फायटर पायलट म्हणून रुजू झाल्या. त्यांच्यापासून अनन्या शर्मा यांनी प्रेरणा घेतली. त्यानंतर
पाच वर्षांनी अनन्या यांचेही स्वप्न पूर्ण झाले आहे.
...आई, मुलीनेही घडविला होता इतिहास
अमेरिकेतील स्काय वेस्ट एअरलाइन्ससाठी आई व मुलीने मिळून २०२० साली मातृदिनाच्या निमित्ताने एक प्रवासी विमान उडविले होते.
कॅप्टन सुझी गॅरेट यांना प्रवासी विमान उडविण्याचा ३२ वर्षांचा अनुभव आहे. त्या व त्यांची पुत्री डोना गॅरेट या दोघींनी मिळून विमान उड्डाण करून नवा इतिहास घडविला होता.