फोकस

By admin | Published: August 18, 2015 09:37 PM2015-08-18T21:37:09+5:302015-08-18T21:37:09+5:30

राजकीय खेळी उलटली

Focus | फोकस

फोकस

Next
जकीय खेळी उलटली
भ्रष्टाचारप्रकरणी एखाद्या लोकप्रतिनिधीवर खटले दाखल होऊन त्याला अटक होण्याचे अनेक प्रकार महाराष्ट्रासह देशात घडले आहेत. यातील बर्‍याच जणांवर गुन्हे सिद्ध झाले तर काही जणांची यातून सहीसलामत सुटकाही झाली. परंतु लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळात मोठ्या प्रमाणावर झालेल्या गैरकारभारातील प्रमुख आरोपी आमदार रमेश कदम यांचे प्रकरण हे वरवर साधे दिसत असले तरी याचे परिणाम संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावर होतील की काय, असे वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबईतील गोराईसारख्या उपनगरात राहणारा एक युवक दहा-बारा वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांच्या संपर्कात येतो काय आणि अल्पावधीत एका महामंडळाचा अध्यक्ष आणि पुढे आमदार होतो काय, हा साराच सिनेस्टाईल जीवनपट सामान्य माणसाला अचंबित करणारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाकांक्षी आणि दिग्गज नेत्यांच्या नावांची यादी पाहिली तर संघटनेत जेवढे नेते तेवढे गट असल्याचे कुणाही सामान्य माणसाला लक्षात आल्याशिवाय राहत नाही. असे जरी असले तरी शरद पवार आणि अजित पवार असे पक्षात प्रमुख दोन गट असल्याचे कुणीही नाकारू शकत नाही. या दोन गटांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या संधी कोणी सोडल्याचे आतापर्यंत कधी दिसले नाही. मोहोळ तालुक्यातील पक्षांतर्गत राजकीय विरोधकांना संपविण्यासाठी रमेश कदमसारख्या उमेदवाराला संधी देऊन राष्ट्रवादीच्या स्थानिक आणि वरिष्ठ नेत्यांनी जी खेळी केली ती आज त्यांच्याच अंगलट आली असल्याचे दिसते आहे. ४०० कोटी रुपयांच्या आसपास गैरव्यवहार केल्याप्रकरणी बेड्या ठोकलेले कदम हे या प्रकरणातील एकटेच लाभार्थी नाहीत, हे कोणाला सांगण्याची गरज नाही. त्यांनी गैरमार्गाने लुटलेली ही माया वेगवेगळ्या रूपाने पक्षाच्या किती नेत्यांपर्यंत पोहोचलेली आहे, हे सीआयडीच्या चौकशीत बाहेर येईलच. त्यातूनही कदम यांचा फटकळ आणि उद्धट स्वभाव पाहता हे सारे प्रकरण फार दिवस पडद्याआड राहील की नाही याबाबत शंका वाटते. एवढे सारे नाट्य होऊनही विद्यमान सरकारमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर सातत्याने आंदोलने करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेत्यांनी कदम यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून झालेली अटक यासंदर्भात एक चकार शब्दही काढला नाही किंवा त्यांना साधी शिस्तभंगाची नोटीसही दिली नाही, यावरून कदम यांनी केलेल्या गैरव्यवहाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, हे स्पष्टपणे दिसते आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष जरी १६ वर्षांपूर्वी स्थापन झाला असला तरी या संघटनेत काम करणार्‍या नेतेमंडळींच्या अनेक पिढ्या राजकारणात गेल्या आहेत. परंतु गेल्या आठ-दहा वर्षांपूर्वी पक्षात आलेले कदम हे आपल्या गैरवर्तनाने जेव्हा पक्षसंघटनेपेक्षा मोठे होऊ पाहत होते, तेव्हा त्यांना साधे फटकारण्याचे धाडसही कुठल्या नेत्याने केले नाही, यावरून ज्यांनी ही राजकीय खेळी केली त्यांच्यावरच उलटली आहे, असे म्हणावेसे वाटते.
- महेश कुलकर्णी

Web Title: Focus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.