‘पीएमओ’कडे अधिकार केंद्रित झाल्याने देश आर्थिक संकटात: अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 02:27 AM2019-10-21T02:27:16+5:302019-10-21T06:04:27+5:30
नोबेल मिळाल्यानंतर डॉ. बॅनर्जी या सप्ताहांतास प्रथमच सपत्नीक भारतात आले होते.
नवी दिल्ली : भारतीय अर्थव्यवस्थेवर सध्या जे मंदीचे संकट आले आहे त्यास तीन वर्षांपूर्वीची नोटाबंदी व पूर्ण तयारी न करता घाईघाईने लागू केलेला वस्तू व सेवाकर (जीएसटी) याखेरीज पंतप्रधान कार्यालयात सत्तेचे नको तेवढे केंद्रीकरण होणे हेही एक प्रमुख कारण आहे, असे मत यंदाचा नोबेल पुरस्कार जिंकणारे अर्थतज्ज्ञ डॉ. अभिजित बॅनर्जी यांनी व्यक्त केले आहे.
नोबेल मिळाल्यानंतर डॉ. बॅनर्जी या सप्ताहांतास प्रथमच सपत्नीक भारतात आले होते. ‘दि वायर’ या आॅनलाइन न्यूज पोर्टलसाठी करण थापर यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, ‘जीएसटी’ सारखी आमूलाग्र बदल घडविणारी नवी अप्रत्यक्ष करव्यवस्था लागू झाल्यावर अडचणी येणे स्वाभाविक होते व अन्य कोणते सरकार असते तरी ते या अडचणी याहून चांगल्या प्रकारे हाताळू शकले असते असेही नाही.
ते असेही म्हणाले की, कंपन्यांवरील प्राप्तिकराच्या दरात कपात केल्याने गुंतवणुकीस चालना मिळून विकासाला गती येईल, याची खात्री देता येणार नाही. त्यासाठी ज्यायोगे बाजारातील मागणी वाढेल अशा उपायांचीही जोड द्यावी लागेल. त्यासाठी व्यक्तिगत प्राप्तिकरात कपात करून लोकांच्या हाती जास्त पैसा राहिल असे पाहणे व प्रधानमंत्री किसान योजनेसारख्या योजनांव्दारे ग्रामीण अर्थव्यवस्थेत आणखी पैसा खळविणे हे अन्य उपाय आहेत.
सरकारने शहरी भागातील महागाईला आळा घालण्यासाठी शेतमालाच्या आधारभूत किंमती जाणीवपूर्वक कमी ठेवल्याने ग्रामीण भागातील मागणी कमी झाली व सरकारने पुरवठादार व कंत्राटदारांचे पैसे वेळेवर चुकते न केल्याने अनेक प्रकल्प रखडणे हेही मंदीचे एक कारण आहे, असेही त्यांनी विश्लेषण केले.
या दौऱ्यात डॉ. बॅनर्जी यांनी त्यांनी जेथे शिक्षण घेतले त्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठासही भेट दिली. तेथे बोलताना ते म्हणाले की, याच विद्यापीठात माझ्या सहाध्यायी असलेल्या निर्मला सीतारामन आज देशाच्या वित्तमंत्री आहेत, याचा नक्कीच अभिमान वाटतो. सीतारामन यांनी कंपन्यांचा प्राप्तिकर वाढविण्याचा योग्य निर्णय घेतला होता. पण नंतर दडपणाला बळी पडून त्यांनी यात कपात करण्याची चूक केली, असे मला वाटते.
भाजपच्या व्यक्तिगत टीकेने व्यथित
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल व भाजपचे राष्ट्रीय चिटणीस राहुल सिन्हा यांच्यासारख्या भाजप नेत्यांनी नोबेल पुरस्कारावरून केलेल्या व्यक्तिगत टीकेने आपण व्यथित झालो, असे डॉ. बॅनर्जी म्हणाले.ते म्हणाले की, माझ्या सल्ल्याने काँग्रेसने आखलेली ‘न्याय’ योजना मतदारांनी नाकारली, असे भाजप म्हणते; पण त्यानिमित्ताने हा विचार लोकांपुढे गेला, याचे मला समाधान आहे. मी एक अर्थतज्ज्ञ म्हणून व्यावसायिक सल्ला दिला होता. तो काँग्रेसप्रमाणे इतरांनाही घेता आला असता.