खाणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर जनावरेही करतात! माणसाची काही इतरही कर्तव्ये - मोहन भागवत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 08:21 AM2022-07-14T08:21:18+5:302022-07-14T08:22:34+5:30
एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले, जर माणसाकडे बुद्धी नसती, तर तो पृथ्वीवरील सर्वात कमकुवत प्राणी असला असता.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात भाष्य केले आहे. खाणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर जनावरेही करतात. पण केवळ जिवंत राहणे हाच जीवनाचा उद्देश नसावा. मणसाची इतर अनेक कर्तव्य आहेत, असे भागवत यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, देशात लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात चर्चा सुरू असतानाच भागवतांनी हे भाष्य केले आहे.
एका कार्यक्रमाला संबोधित करताना मोहन भागवत म्हणाले, जर माणसाकडे बुद्धी नसती, तर तो पृथ्वीवरील सर्वात कमकुवत प्राणी असला असता. पण, मनुष्याला संज्ञानात्मक प्रेरणा मिळाली आणि तिने त्याला सर्वश्रेष्ठ बनवले. मात्र, केवळ खाणे-पिणे आणि लोकसंख्या वाढविणे, ही कामे तर प्राणीही करतात.
भागवत पुढे म्हणाले, जो शक्तीशाली आहे, तो जीवन जगेल, हा जंगलाचा नियम आहे. मात्र, सर्वात योग्य व्यक्ती इतरांना जगण्यास मदत करेल, ही माणसाची व्याख्या आहे. ते कर्नाटकातील चिकबल्लापुरा जिल्ह्यातील मुद्देनहल्लीमध्ये सत्य साईं ग्राम येथे ‘श्री सत्य साईं युनिव्हर्सिटी फॉर ह्यूमन एक्सिलन्स’च्या पहिल्या दीक्षांत समारंभादरम्यान भागवत बोलत होते.
भागवत म्हणाले, ‘‘जर 10-12 वर्षांपूर्वी कुणी म्हणाले असते, की भारत मोठी प्रगती करेल, तर आपण ते गांभीर्याने घेतले नसते.’’ ते म्हणाले, राष्ट्राची प्रक्रिया एकाएकीच सुरू झाली नही, तर ती 1857 पासून आहे, जी स्वामी विवेकानंद पुढे घेऊन गेले. आध्यात्मिक साधनांच्या माध्यमाने उत्कृष्टता प्राप्त केली जाऊ शकते. कारण अद्याप विज्ञानाला सृष्टीचा उगम समजलेला नाही, असेही भागवत म्हणाले.