मोदींसाठी ट्रम्पतर्फे भोजन समारंभ
By admin | Published: June 25, 2017 12:48 AM2017-06-25T00:48:58+5:302017-06-25T00:48:58+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी पोर्तुगाल, नेदरलँड व अमेरिका या तीन देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले असून, त्यातील अमेरिका दौरा अतिशय महत्त्वाचा आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी पोर्तुगाल, नेदरलँड व अमेरिका या तीन देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले असून, त्यातील अमेरिका दौरा अतिशय महत्त्वाचा आहे.
डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी अमेरिकेत जात आहेत. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि मोदी यांची चार वेळा भेट झाली होती.
सोमवारी मोदी व ट्रम्प यांची भेट होणार असून, त्यांच्यात तब्बल पाच तास चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते. मोदी यांच्या सन्मानार्थ ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये सोमवारी रात्री भोजन समारंभ आयोजित केला आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर परदेशी पाहुण्यासाठी व्हाइट हाउसमध्ये आयोजित करण्यात येणारा हा पहिला भोजन समारंभ आहे. एच१बी व्हिसाचा विषय चर्चेचा भाग नसेल, असे व्हाइट हाउसने स्पष्ट केले आहे.
दोन्ही नेते दहशतवाद, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरण व त्यासाठी अमेरिकेची मदत, संबंधांना बळकटी, व्यापारात वाढ यावर चर्चा करतील. त्याची माहिती निवेदनाद्वारे सर्वांना दिली जाणार आहे. ट्रम्प व मोदी माध्यमांच्या प्रतिनिधींनाही भेटणार आहेत. त्यानंतर प्रतिनिधी पातळीवरही दोन देशांमध्ये चर्चा होणार आहे आणि अमेरिकन बड्या कंपन्यांच्या सीईओबरोबरही मोदी यांची भेट ठरली आहे.
अमेरिका दौऱ्याचा प्रमुख हेतू दोन देशांमधील संबंध बळकट करणे हा असून, त्या संबंधांचा फायदा भारताला आणि जगालाही होईल, असे मोदी यांनी दौरा सुरू करण्यापूर्वी टिष्ट्वटद्वारे नमूद केले आहे.
मोदी पोर्तुगालला पोहोचले. तेथून ते वॉशिंग्टनला जातील आणि अमेरिका दौऱ्यानंतर नेदरलँडला जाणार आहेत. नेदरलँडमध्ये डच पंतप्रधान मार्क रट व राजे विल्यम
अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेणार आहेत.