खादाड चोर! आमदाराचं घर फोडलं, पण मौल्यवान वस्तू तशाच अन् घेऊन गेले काजू-बदाम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 06:12 PM2022-08-09T18:12:33+5:302022-08-09T18:17:40+5:30
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये चोरांनी बसपा आमदाराच्या बंद असलेल्या घरात चोरी केली. पण चोरांनी घरातील कोणत्याही वस्तू न नेता चक्क काजू-बदाम आणि राशनचं सामान चोरी केलं आहे.
भोपाळ-
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये चोरांनी बसपा आमदाराच्या बंद असलेल्या घरात चोरी केली. पण चोरांनी घरातील कोणत्याही वस्तू न नेता चक्क काजू-बदाम आणि राशनचं सामान चोरी केलं आहे.
भोपाळमधील 74 बंगला परिसरातील ही घटना आहे. दमोहच्या पथरिया विधानसभा मतदार संघाच्या आमदार रामबाई यांना नंबर बी-23 बंगला देण्यात आला होता. गेल्या महिनाभरापासून आमदार रामबाई भोपाळमध्ये नव्हत्या. त्यामुळे बंगला बंदच होता. पण सोमवारी जेव्हा त्या बंगल्यावर परतल्या तेव्हा बंगल्याचं टाळं तुटलेलं त्यांनी पाहिलं. आत गेल्यानंतर कळालं की घरात चोरी झाली आहे.
चोरांनी किचनमधील सामान चोरी केल्याचं लक्षात आलं. यात काजू-बादाम, तांदूळ-डाळी आणि पीठासह इतर अन्नधान्यावर डल्ला मारल्याचं लक्षात आलं. याशिवाय बंगल्यावर लावण्यात आलेल्या लाइट्स देखील चोरीला गेल्याचं आढळून आलं आहे.
टीटी पोलीस ठाण्याचे अधिक्षक चैन सिंह रघुवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार रामबाई गेल्या काही काळापासून भोपाळमध्ये नव्हत्या. याच दरम्यान चोरांनी बंद असलेल्या बंगल्याला लक्ष्य केलं. सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
पॉश परिसरात आहे बंगला
भोपाळचा 74 बंगला परिसरात शहरातील पॉश परिसर म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मध्य प्रदेश सरकारमधील अनेक मंत्री, आमदार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थानं आहेत. इतकंच नाही, तर भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांचंही निवासस्थान याच ठिकाणी आहे.