५३ वर्षांपासून बहिणी समाधीवर बांधत आहेत राखी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2024 07:32 AM2024-08-20T07:32:56+5:302024-08-20T07:33:10+5:30
भारत-पाकिस्तान सीमेवरील सिंबल गावातील असेही रक्षाबंधन
- बलवंत तक्षक
चंडीगड : भारत-पाकिस्तान सीमेवर असलेल्या सिंबल या गावात एका समाधीवर या बहिणी ५३ वर्षांपासून राखी बांधत आहेत. १९७१ च्या भारत पाक युद्धात शहीद झालेले रेडिओ ऑपरेटर नायक कमलजित सिंह यांची आहे. बीएसएफ चौकीवर बांधलेल्या आपल्या भावाच्या समाधीवर जालंधरच्या अमृतपाल कौर गेली ४३ वर्षे अखंड राखी बांधत होत्या.
आठ वर्षांपूर्वी कॅन्सरशी लढा देत अमृतपाल कौर यांनी हे जग सोडले. तरीही शहीद भावाच्या समाधीवर राखी बांधण्याची परंपरा कायम आहे. शहीद सैनिक परिवार सुरक्षा परिषदेचे सरचिटणीस कुंवर रवींद्र सिंह यांनी सांगितले की, आजारी असलेल्या अमृतपाल कौर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी ते रुग्णालयात गेले असता त्यांनी परिषदेच्या सदस्यांकडून वचन घेतले होते की, राखी बांधण्याची परंपरा थांबणार नाही.
कमलजित ज्या गावात शहीद झाले त्या गावातील मनप्रीत कौर, हरप्रीत कौर, हरमन कौर, संदीप कौर, मनदीप कौर आणि मनप्रीत कौर यांनी शहीदांच्या कुटुंबीयांसह कमलजित यांच्या समाधीस्थळी राखी बांधून ५२ वर्षांपूर्वी सुरू केलेली परंपरा कायम राखली. येथे तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनाही त्यांनी राखी बांधली.
१९७१ मध्ये झाले जवान शहीद
भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान ४ डिसेंबर १९७१ रोजी जेव्हा पाकिस्तानी सैन्याने या चौकीवर हल्ला केला तेव्हा कमलजित हे शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिले.
पाकिस्तानी लष्कराचा पराभव करत सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी नंतर त्यांचे सहकारी रेडिओ ऑपरेटर नायक कमलजित यांच्या बलिदानाचा बदला घेतला होता.