कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आज काश्मीर दौऱ्यावर, करोडोंच्या प्रकल्पाचे करणार उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2024 07:59 AM2024-03-07T07:59:34+5:302024-03-07T08:00:16+5:30
लोकसभा निवडणुकीची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात दौरे सुरू केले आहेत. जम्मू काश्मीर मधील कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच जम्मू दौऱ्यावर जात आहेत.
लोकसभा निवडणुकीची सर्व पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात दौरे सुरू केले आहेत. जम्मू काश्मीर मधील कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच जम्मू दौऱ्यावर जात आहेत. यावेळी ते काही प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. जम्मू काश्मीर मध्ये ६४०० कोटी रुपयांचे विकास प्रकल्प भेट देतील आणि १००० तरुणांना नोकरीची नियुक्ती पत्र देतील. पंतप्रधान श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.
कलम ३७० हटवल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच काश्मीर दौरा आहे. यापूर्वी २०१९ मध्ये नरेंद्र मोदी जम्मू-काश्मीरमध्ये प्रचारासाठी गेले होते. पंतप्रधानांच्या दौऱ्यासंदर्भात श्रीनगरमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. या कार्यक्रमासाठी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या जाहीर सभेत २ लाखांहून अधिक लोक सहभागी होतील, असा भाजपचा दावा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता श्रीनगरमधील बक्षी स्टेडियममध्ये पोहोचतील, जिथे ते 'विकसित भारत विकसित जम्मू-काश्मीर' कार्यक्रमात सहभागी होतील. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान जम्मू आणि काश्मीरमध्ये कृषी-अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी सुमारे ५००० कोटी रुपयांचा 'संमिश्र कृषी विकास कार्यक्रम' राष्ट्राला समर्पित करतील. पंतप्रधान स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनेंतर्गत १४०० कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या पर्यटन क्षेत्राशी संबंधित अनेक प्रकल्प लॉन्च करतील, ज्यात 'हजरतबल तीर्थाचा एकात्मिक विकास' प्रकल्पाचाही समावेश आहे.
याशिवाय पंतप्रधान जम्मू-काश्मीरमधील सुमारे १००० नवीन सरकारी कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वाटप करतील आणि विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवादही साधतील.
भारतातील पर्यटनाला चालना देण्यासाठी भारतीय डायस्पोरा यांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान 'चलो इंडिया ग्लोबल डायस्पोरा कॅम्पेन' लाँच करतील. पंतप्रधानांच्या आवाहनावर आधारित ही मोहीम सुरू केली जात आहे, यामध्ये त्यांनी भारतीय डायस्पोरा सदस्यांना किमान ५ गैर-भारतीय मित्रांना भारत भेटीसाठी प्रोत्साहित करण्याची विनंती केली. ३ कोटींहून अधिक परदेशी भारतीयांसह, भारतीय डायस्पोरा सांस्कृतिक राजदूत म्हणून काम करून भारतीय पर्यटनासाठी एक शक्तिशाली उत्प्रेरक म्हणून काम करू शकतात.