जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग येथील प्रकल्पाला लक्ष्य करत प्रथमच दहशतवाद्यांनी केला हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 01:31 PM2024-10-22T13:31:36+5:302024-10-22T13:36:37+5:30

मजुरांच्या हत्येचा सुरक्षा दल बदला घेईल- नायब राज्यपाल

For the first time, terrorists attacked a project in Sonmarg in Jammu and Kashmir | जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग येथील प्रकल्पाला लक्ष्य करत प्रथमच दहशतवाद्यांनी केला हल्ला

जम्मू-काश्मीरमधील सोनमर्ग येथील प्रकल्पाला लक्ष्य करत प्रथमच दहशतवाद्यांनी केला हल्ला

सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू: जम्मू-काश्मीरच्या सोनमर्ग जिल्ह्यातील गगनगीर क्षेत्रातील झेड वळण बोगद्याच्या कार्यात गुंतलेले कर्मचारी व मजुरांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांबद्दल धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे गत १० वर्षांत या भागात एकही दहशतवादी हल्ल्याची घटना घडली नाही. सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याने हा दहशतवादी हल्ला झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या दहशतवादी हल्ल्यात एक डॉक्टर आणि ६ परप्रांतीय मजुरांसह ७ लोक ठार झाले आहेत.

जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर द रजिस्टेंस फ्रंट या दहशतवादी गटाने केलेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. मात्र, गत दहा वर्षांत या भागात दहशतवादी कारवाया जवळपास नसल्यात जमा होत्या. त्यामुळे या क्षेत्रातील दहशतवाद पूर्णपणे संपल्याचा दावा केला जात होता. या वर्षी जेवढे दहशतवादी हल्ले झाले ते सर्व जम्मू-क्षेत्रात झाले आहेत. मात्र, काश्मीरमध्ये झालेला हा यंदाचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.

लोकांमध्ये दहशत पसरवण्याचे प्रयत्न

  • एखाद्या विकास प्रकल्पाला लक्ष्य करत दहशतवाद्यांनी हल्ला करणे, हेदेखील प्रथमच घडले आहे. 
  • स्थानिक नागरिक व परप्रांतीय मजुरांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी हल्ला करण्याची ही पहिलीच घटना आहे.
  • त्यामुळे विकास प्रकल्पात सहभागी लोकांमध्ये दहशत पसरवण्याचे धोरण दहशतवादी राबवत असल्याचे या कृतीतून स्पष्ट होत आहे.
  • या महत्त्वाच्या बोगद्याचे काम सुरू असताना कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षेची व्यवस्था का करण्यात आली नव्हती,  हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
  • सुरक्षेतील उणिवेमुळे हा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरक्षा दलाने मात्र याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.


स्थलांतरित टार्गेट का?

  • सोनमर्गमध्ये सहा मजुरांसह ७ जणांची दहशतवाद्यांनी केलेली हत्या ही पहिली घटना नाही.
  • स्थलांतरित हे लोकसंख्याशास्त्र बदलण्याच्या कटात सहभागी असल्याचा समज दहशतवाद्यांचा आहे.त्यामुळे स्थलांतरितांना लक्ष्य केले जात आहे. 
  • कलम ३७० हटविल्यानंतरही  स्थलांतरित मजुरांवरील हल्ले कमी झालेले नाहीत.


प्रत्युत्तर दहशतवादी विसरणार नाहीत

गगनगीर क्षेत्रातील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांच्या हत्येचा बदला सुरक्षा दल घेतल्याशिवाय राहणार नाही, असा दावा जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी केला. सुरक्षा दलाने दिलेले प्रत्युत्तर दहशतवादी भविष्यात विसरणार नाहीत, असे  नमूद करत त्यांनी पाकिस्तानला लक्ष्य केले.

Web Title: For the first time, terrorists attacked a project in Sonmarg in Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.