राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच लग्नाचे सनई चौघडे वाजणार; कोण आहे ही भाग्यवान मुलगी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 14:27 IST2025-01-31T14:26:27+5:302025-01-31T14:27:02+5:30

पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात अशाप्रकारचा लग्नसोहळा होणार असून या विवाहासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था असणार आहे

For the first time, the wedding of an officer Poonam Gupta, Assistant Commandant CRPF is going in the Rashtrapati Bhavan | राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच लग्नाचे सनई चौघडे वाजणार; कोण आहे ही भाग्यवान मुलगी?

राष्ट्रपती भवनात पहिल्यांदाच लग्नाचे सनई चौघडे वाजणार; कोण आहे ही भाग्यवान मुलगी?

नवी दिल्ली - राष्ट्रपती भवनातील मदर टेरेसा क्राऊन परिसरात पहिल्यांदाच लग्नाची सनई चौघडे वाजणार आहे. याठिकाणी पूनम गुप्ता नावाच्या मुलीचं लग्न होणार आहे. पूनम गुप्ता सीआरपीएफमध्ये असिस्टेंट कमांडेंट म्हणून राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेत तैनात आहे. येत्या १२ फेब्रुवारीला तिचं लग्न होणार आहे. या लग्न सोहळ्यात दोन्ही कुटुंबातील फक्त जवळचे लोक उपस्थित राहतील. मुलगाही सीआरपीएफमध्ये असिस्टेंट कमांडेंट आहे. राष्ट्रपती भवनात लग्न करणारी पूनम गुप्ता आहे कोण हे जाणून घेऊया. 

सीआरपीएफची महिला अधिकारी पूनम गुप्ता सध्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे PSO म्हणून तैनात आहे. पूनमचा स्वभाव आणि चांगल्या कामगिरीमुळे द्रौपदी मुर्मू तिच्यावर खूप खुश आहेत. त्यांच्या सांगण्यावरूनच हे लग्न राष्ट्रपती भवनातील मदर टेरेसा क्राऊन परिसरात होणार आहे. पूनमचं लग्न जम्मू काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या असिस्टेंट कमांडेंट पदावर असणाऱ्या अवनीश कुमार याच्याशी होणार आहे. १२ फेब्रुवारीला होणाऱ्या या लग्नावेळी दोन्ही कुटुंबातील मोजकेच लोक उपस्थित राहतील. पूनम मध्य प्रदेशातील शिवपुरी येथील रहिवासी असून तिचे वडील रघुवीर गुप्ता हे नवोदय विद्यालयात अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. 

असिस्टेंट कमांडेंट पूनम गुप्ताने २०२४ साली प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या परेडमध्ये सीआरपीएफच्या महिला तुकडीचं नेतृत्व केले होते. पूनम गुप्ताने पदवीचं शिक्षण घेत इंग्रजी साहित्यात पोस्ट ग्रॅज्युएट केले आहे. ती जवाहर नवोदय विद्यालयाची विद्यार्थिनी होती. तिने २०१८ मध्ये झालेल्या यूपीएससी परीक्षेत ८१ वी रँक मिळवून सीआरपीएफमध्ये असिस्टेंट कमांडेंट बनली. 

दरम्यान, पहिल्यांदाच राष्ट्रपती भवनात अशाप्रकारचा लग्नसोहळा होणार असून या विवाहासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था असणार आहे. काही मोजकेच निमंत्रित या लग्न सोहळ्याला उपस्थित राहतील. त्यात नातेवाईक आणि मित्र परिवार यांच्यातील काहींना राष्ट्रपती भवनात लग्न सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी परवानगी दिली जाईल. पूनम गुप्ताचं लग्न ठरलंय हे समजल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीच पूनमचं लग्न राष्ट्रपती भवनातील मदर टेरेसा क्राऊन परिसरात करण्याची व्यवस्था केली आहे.

Web Title: For the first time, the wedding of an officer Poonam Gupta, Assistant Commandant CRPF is going in the Rashtrapati Bhavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.