'मुख्यंत्रीपदासाठी भाजपला दूर केले अन् विरोधकांसोबत सत्ता स्थापन केली', एकनाथ शिंदेंचा पलटवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 09:15 PM2022-09-21T21:15:10+5:302022-09-21T21:15:21+5:30
'बाळासाहेब म्हणायचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शत्रू आहे, त्यांना जवळ करू नका.'
नवी दिल्ली: एकीकडे मुंबईतून आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला. तर, दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतून उद्धव ठाकरेंवर पलटवार केला. 'आम्ही बाळासाहेबांची आणि आनंद दिघेंची विचारधारा मानणारे लोक आहोत. तीन महिन्यांपूर्वी अनेकांनी आम्हाला सांगितले की, महाराष्ट्रात बदलाची गरज आहे. त्यामुळेच राज्यात परिवर्तन झाले. याची दखल फक्त राज्याने नाही, तर संपूर्ण देशाने घेतली,' असं शिंदे म्हणाले.
'ज्यांच्याविरोधात वर्षानुवर्षे लढलो...'
शिंदे पुढे म्हणाले, 'हा उठाव आम्ही मुख्यमंत्री बनण्यासाठी केला नाही. आम्ही सत्तेत होतो, सत्ता कोणी सोडत नसतो. विरोधी पक्षातून सत्तेत जातात, पण आम्ही सत्तेला सोडून गेलो. हे देशातील पहिलेच प्रकरण आहे. अडीच वर्षांपूर्वी आम्ही भाजपसोबत लढलो. एकीकडे बाळासाहेबांचा फोटो आणि दुसरीकडे नरेंद्र मोदींचा फोटो होता. हिंदुत्वाच्या भूमिकेसाठी आम्ही एकत्र होतो. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार येणार, असा अनेकांनी विचार केला होता. पण, ज्यांच्याविरोधात(काँग्रेस-राष्ट्रवादी) आम्ही वर्षानुवर्षे लढलो, त्यांच्यासोबत यांनी सरकार स्थापन केले,' अशी टीका त्यांनी यावेळी केली.
'मुख्यंत्रिपदाच्या खुर्चीसाठी भाजपला दूर केले'
शिंदे पुढे म्हणाले, 'बाळासाहेब म्हणायचे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी शत्रू आहेत, त्यांना जवळ करू नका. त्यांना जवळ करण्याची वेळ आल्यावर मी माझा पक्ष बंद करेल. पण, काय झाल? मुख्यंत्रिपदाच्या खुर्चीसाठी भाजपला दूर करुन राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळेस अनेकांनी विरोध केला, पण प्रमुखांच्या आदेशापुढे आम्ही गेलो नाही. अडीच वर्षात कुणीही खुश नव्हते. आमची सत्ता असूनही, आमचे लोक तुरुंगात जात होते. शिवसैनिकांवर अन्याय सुरू होता. हे काम सरकारमधील लोक करत होते.'
'बाळासाहेबांनी सत्तेसाठी विचारधारा सोडली नाही'
'आमचे आमदार नेहमी माझ्याकडे यायचे, मी त्यांचे ऐकायचो. जेवढी होईल, तेवढी मदत मी करायचो. ज्यांनी मदत करायला हवी, त्यांनी केली नाही. मुख्यमंत्रिपदावर आमचा नेता असूनही आमच्यावर अन्याय व्हायचा. अन्याय मर्यादेपेक्षा जास्त झाल्यामुळेच हा उठाव केला. आम्ही चुकीचे काम केले असते, तर मी जातो तिथे हजारो-लाखो लोकांची गर्दी जमली नसती. आम्ही घेतलेली भूमिका बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांची भूमिका आहे. सरकार किंवा सत्तेसाठी त्यांनी कधीची आपली विचारधारा सोडली नाही. सत्तेसाठी त्यांनी कधीही आपली भूमिका बदलली नाही. आपण सगळे त्यांचे शिवसैनिक आहोत. त्यामुळेच आमच्या भूमिकेचे स्वागत अनेकांनी केले,' असंही ते म्हणाले.