निवाऱ्यासाठी पुलालाच ३ फुटांचे पाडले भगदाड, गावदेवीतील प्रकार; तिघांना अटक 

By मनीषा म्हात्रे | Published: March 24, 2023 10:31 AM2023-03-24T10:31:39+5:302023-03-24T10:32:09+5:30

गावदेवीतील दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ‘फ्रेंच ब्रिज’खाली तब्बल ३ बाय २ फुटांचे भगदाड पाडण्यात आले होते.

For the shelter, the bridge itself has a 3-foot rampart, the type in Gavdevi; Three arrested | निवाऱ्यासाठी पुलालाच ३ फुटांचे पाडले भगदाड, गावदेवीतील प्रकार; तिघांना अटक 

निवाऱ्यासाठी पुलालाच ३ फुटांचे पाडले भगदाड, गावदेवीतील प्रकार; तिघांना अटक 

googlenewsNext

- मनीषा म्हात्रे 

मुंबई : डोक्यावर छप्पर नाही, त्यात उन्हाळा सुरू होण्याआधीच पाऊस कोसळण्यास सुरुवात झाल्याने उड्डाणपुलाखाली राहणाऱ्या एका कुटुंबाने थेट पुलालाच भगदाड पाडून निवारा तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार गावदेवीत समोर आला आहे. गावदेवीतील दीडशे वर्षांचा इतिहास असलेल्या ‘फ्रेंच ब्रिज’खाली तब्बल ३ बाय २ फुटांचे भगदाड पाडण्यात आले होते.

एका सुज्ञ नागरिकामुळे हा  प्रकार समोर येताच, पालिका प्रशासनाने तत्काळ हे भगदाड बुजवून पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यानुसार, गावदेवी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे. डी वार्डचे ज्युनियर इंजिनीअर रावसाहेब सांगोलकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,  २१ मार्च रोजी सकाळी ८ वाजता पुलाला काहींनी भगदाड पाडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. त्याच, परिसरात राहणाऱ्या एका वृद्धाने सतर्क होत पुलाला भगदाड पाडत असताना व्हिडीओ काढून अधिकाऱ्यांना कळविले होते. त्यात तीन जण हे भगदाड पाडताना दिसून आले.

हा व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी फ्रेंच पुलाखाली राहून फुलविक्री करणाऱ्या सूरजकुमार राधेलाल यादव (४०), किरण दिलीप कांबळे (२७) आणि निशा संजू थापा (३०) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीत नुकत्याच झालेल्या पावसामुळे त्यांनी स्वतःसाठी निवारा व्हावा यासाठी भगदाड पाडल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार, तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे. 

मोठा अनर्थ टळला 
गिरगावातून गावदेवी परिसरात जाण्यासाठी फ्रेंच ब्रिजचा वापर होतो. तसेच, वाहनांबरोबर पादचारीही त्याचा वापर करतात. भगदाड पाडण्याचा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. 

पुलाखालीच कुटुंब अन् व्यवसाय 
पुलाच्या भिंतींना लागून दोन्ही बाजूने मोकळा भाग राखून ठेवण्यात आला आहे. फ्रेंच ब्रिजच्या दोन्ही बाजूंना पादचाऱ्यांसाठी करण्यात आलेल्या वाटेत काही जणांनी संसार थाटला आहे. तर, काहींनी व्यवसाय सुरू केला आहे.   

अटकेची कारवाई 
प्राथमिक तपासात, निवाऱ्यासाठीच त्यांनी हा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी तिघांवर अटकेची कारवाई केली असून, अधिक तपास सुरू आहे. 
- डॉ. अभिनव देशमुख, 
पोलिस उपायुक्त, परिमंडळ २

Web Title: For the shelter, the bridge itself has a 3-foot rampart, the type in Gavdevi; Three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई