राजीनामा देण्यास भाग पाडले!

By admin | Published: February 8, 2017 01:36 AM2017-02-08T01:36:27+5:302017-02-08T01:36:27+5:30

तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी पक्ष प्रमुख व्ही. के. शशिकला यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री बंडाचे निशाण फडकाविले

Forced to resign! | राजीनामा देण्यास भाग पाडले!

राजीनामा देण्यास भाग पाडले!

Next

चेन्नई : तामिळनाडूचे मुख्यमंत्री ओ. पन्नीरसेल्वम यांनी पक्ष प्रमुख व्ही. के. शशिकला यांच्याविरुद्ध मंगळवारी रात्री बंडाचे निशाण फडकाविले. मला पदाचा राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आहे. तामिळनाडूची जनता, अद्रमुक कार्यकर्ते आणि आमदारांची इच्छा असेल तर मी राजीनामा मागे घेईन, असे सांगून पनीरसेल्वम यांनी बॉम्बगोळा टाकला. त्यांच्या या पवित्र्याने तामिळनाडूतील राजकीय घटनाक्रमाला वेगळे वळण मिळाले आहे.

दिवंगत जयललिता यांच्या मरिना येथील समाधीस्थळी रात्री ४० मिनिटे ध्यानमुद्रेत बसून पन्नीरसेल्वम यांनी राज्यासह देशाचे लक्ष्य वेधून घेतले. पक्षाच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग प्रशस्त व्हावा यासाठी पनीरसेल्वम यांनी पदाचा राजीनामा दिला होता. राज्यपालांनी पनीरसेल्वम यांचा राजीनामा स्वीकारला. तथापि, नवे सरकार स्थापन होईपर्यंत मुख्यमंत्री म्हणून कामकाज पाहण्यास सांगितले आहे.

पन्नीरसेल्वम म्हणाले वरदा येथील परिस्थिती मी यशस्वीरित्या हाताळल्यामुळे शशीकला यांना राग आला होता. जलिकट्टू माझ्यासाठी मोठा विजय होता केंद्र सरकारशी सतत चर्चा करून मी तो खेळ मिळवण्यात यशस्वी ठरलो,असे ते म्हणाले.
केवळ लोकप्रिय नेताच मुख्यमंत्री बनू शकतो, असे म्हणून पन्नीरसेल्वम यांनी शशीकला यांचे आव्हान स्वीकारले आहे. जयललिता यांचा आत्मा माझ्याशी बोलला, असे सांगून पनीरसेल्वम म्हणाले की, ‘‘जयललितांचा आत्मा म्हणाला की काही सत्य तमिळनाडुच्या लोकांना सांग.’’ ते म्हणाले की जयललिता मला म्हणाल्या होत्या की लोकांना जो स्वीकारार्ह आहे अशा कोणा एकाची निवड करा.
पनीरसेल्वम रात्री नऊ वाजता जयललितांच्या समाधीस्थळी पोहोचले.

पक्ष कार्यकर्ते किंवा सुरक्षा यंत्रणांना याचा थांगपत्ताही नव्हता. समाधीजवळ ते ४० मिनिटे ध्यानमुद्रेत होते. ९ वाजून ४० मिनिटांनी ध्यानमुद्रेतून बाहेर येऊन त्यांनी समाधीस्थळाला प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर ते पत्रकारांना सामोरे गेले. अद्रमुकसाठी मंगळवार हा प्रचंड राजकीय उलथापालथीचा दिवस ठरला. पन्नीरसेल्वम यांच्या बंडाच्या पवित्र्यापूर्वी पक्षाचे संस्थापक सदस्य पी. एच. पांडियन यांनी जयललितांचा मृत्यू आणि शशिकला यांच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून बॉम्ब टाकला होता. त्यानंतर दुपारी जयललिता यांची भाची दीपा जयकुमार यांनी निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती.

तमिळनाडूतील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव हे चेन्नईला मंगळवारी किंवा बुधवारी रवाना होतील, असे राजभवनच्या सूत्रांनी सांगितले. राव यांच्याकडे तमिळनाडुच्या राज्यपालपदाचीही जबाबदारी आहे. अ. भा. राज्यपाल विद्यासागर राव सोमवारी रात्री दिल्लीहून चेन्नईला जाण्याऐवजी मुंबईला आल्यामुळे शशिकला यांचा ताबडतोब शपथविधी होईल ही शक्यताही विरळ झाली. बेहिशेबी मालमत्येच्या खटल्यात शशीकला यांच्याबाबतचा निवाडा लवकरच दिला जाईल, असे संकेत सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिले होते.

Web Title: Forced to resign!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.