Video : कन्हैयाला मतदान करणाऱ्या महिलेस जबरदस्ती, अधिकाऱ्यांनी कमळाचं बटण दाबायला लावलं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2019 04:57 PM2019-04-29T16:57:43+5:302019-04-29T17:01:32+5:30
कन्हैया आणि गिरीराजसिंह यांच्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. भाजपाने कन्हैयाला देशद्रोही संबोधत कन्हैयाविरोधात प्रचार केला आहे.
पाटणा - लोकसभा निवडणुकांसाठी कन्हैया कुमारच्या बेगुसराय मतदारसंघातही चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. बेगुसराय मतदारसंघाकडेही सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. कन्हैयाच्या विरोधात भाजपाकडून दिग्गज नेते गिरीराज सिंह हे निवडणूक लढवत आहेत. बेगुसराय मतदारसंघातील एका महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये बळजबरीने गिरीराज सिंह यांना मतदान करण्यास सांगितल्याचे ती महिला म्हणत आहे.
कन्हैया आणि गिरीराजसिंह यांच्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले आहे. भाजपाने कन्हैयाला देशद्रोही संबोधत कन्हैयाविरोधात प्रचार केला आहे. तर, मोदींनी देशातील 125 कोटी जनतेला फसवल्याचे कन्हैय्या आपल्या भाषणातून सांगत होता. नेहमीच मोदींविरुद्ध भूमिका बजावत असल्याने कन्हैयाच्या लढतीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर, अनेक सेलिब्रिटीही कन्हैयासाठी प्रचाराच्या मैदानात उतरल्याचे दिसून आले. मात्र, चौथ्या टप्प्यात आज मतदान होत असताना बेगुसराय मतदारसंघात गैरप्रकार उघडकीस आला आहे.
बेगुसराय मतदारसंघातील एका महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत संबंधित महिलेने थेट निवडणूक मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत. मी कन्हैया कुमारच्या नावासमोरील बटण दाबणार होते. मात्र, तेथील अधिकाऱ्याने बळजबरीने मला गिरीराजसिंह यांच्या नावासमोरील बटण दाबण्यास भाग पाडल्याचे ही महिला सांगत आहे. बभगगावा पंचायतमधील हा व्हिडीओ असून महिला जोरजोरात ओरडून सांगत आहे. माझ्यासोबत जबरदस्ती करण्यात आली असून मला गिरीराजसिंह यांना मतदान करण्यास भाग पाडल्याचे ती महिला सांगत आहे. मी एक नंबरवर मतदान करत होते, पण मला क्रमांक 2 चे बटण जबरदस्तीने दाबायला लावल्याचे महिला सांगत आहे. त्यानंतर, तेथील लोकांनी एकत्र येऊन प्रशासन मुर्दाबाद अशी घोषणाबाजी केली आहे.
व्हिडीओ -
भाजपाकडून गिरीराज सिंह पहिल्यांदाच बेगुसराय मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. तर, सीपीआयने कन्हैयाला तिकीट दिले आहे. तर राष्ट्रीय जनता दलाकडून तनवीर हसन हे निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.