Ford Endeavour च्या इंजिनाला आग; बिल्डरचा होरपळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 07:08 PM2018-11-21T19:08:43+5:302018-11-21T19:10:06+5:30
फोर्डच्या एन्डोव्हर या 40 लाखांच्या गाडीला आग लागण्याची ही पहिलीच घटना नसून याआधी एप्रिलमध्येही अशीच आग लागली होती.
अहमदाबाद : अतिशय दणकट आणि सुरक्षित समजल्या जाणाऱ्या फोर्ड कंपनीच्या महागड्या एन्डोव्हर कारलाआग लागल्याने त्यातील बांधकाम व्यावसायिक जळून ठार झाल्याची धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली आहे.
गुजरातमधील बिल्डर मिहीर पांचाळ असे मृताचे नाव असून तो मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास एन्डोव्हरमधून जात होता. मात्र, एसयुव्हीच्या इंजिनाने पेट घेतल्याचे लक्षात आल्यानंतर पांचाळ याने कार रस्त्याच्या बाजुला नेत थांबविली. यावेळी गाडीतून बाहेर पडत असताना अचानक स्फोट झाल्याने त्याच्या आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
पांचाळने गाडी चालवत असताना सीटबेल्ट लावला होता. कार थांबल्यानंतर सीटबेल्ट लॉक झाला होता. यामुळे पांचाळ सीटबेल्ट खोलण्याचा प्रयत्न फसला. स्थानिकांनी पोलिस आणि अग्निशामक दलाला माहिती दिली. मात्र, त्यांच्या पोहोचण्याआधीच पांचाळचा मृत्यू झाला. पोलीस कारला आग लागल्याचे कारण शोधत आहेत.
फोर्डच्या एन्डोव्हर या 40 लाखांच्या गाडीला आग लागण्याची ही पहिलीच घटना नसून याआधी एप्रिलमध्येही अशीच आग लागली होती. यावेळीही इंजिनाने आग पकडली होती. मात्र, चालक आणि आतील प्रवासी बाहेर पडले होते. फोर्ड इंडियाने अद्याप याबाबत कोणताही खुलासा केला नसून अमेरिकेतही फोर्डच्या गाड्यांना आगी लागण्याचे प्रकार घडत आहेत.