सुषमा स्वराज यांचं विमान 14 मिनिटांसाठी बेपत्ता, मॉरिशस हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर संपर्क तुटला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 05:59 PM2018-06-03T17:59:05+5:302018-06-03T18:01:00+5:30
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या मेघदूत या विमानाने दिल्लीहून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर शनिवारी रवाना झाल्या.
नवी दिल्ली : परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेल्या मेघदूत या विमानाने दिल्लीहून दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर शनिवारी रवाना झाल्या. त्याच वेळी त्रिवेंद्रम ते मॉरिशस या प्रवासादरम्यान स्वराज यांच्या विमानाचा मॉरिशसच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी सुमारे 12 ते 14 मिनिटे संपर्क तुटला होता. पण तो पुन्हा प्रस्थापित झाल्याने सा-यांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला.
मेघदूत विमानाने मॉरिशसच्या हवाई हद्दीत प्रवेश केल्यानंतर ही घटना घडल्याने काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यासंदर्भात एअरपोर्ट्स आॅथॉरिटी आॅफ इंडियाच्या (एएआय) वरिष्ठ अधिका-याने सांगितले की, एखादे विमान ज्या हवाई हद्दीत प्रवेश करते तेथील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी असलेला संपर्क अर्धा तास झाल्यानंतरही पुन्हा प्रस्थापित होऊ शकला नाही तर ते विमान बेपत्ता झाल्याचे जाहीर करावे, असा जागतिक संकेत आहे. सुषमा स्वराज यांच्या विमानाशी असलेला संपर्क तुटल्याने बाराव्या मिनिटाला मॉरिशस हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने हे विमान शेवटचे चेन्नई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाच्या संपर्कात होते, तिथे संपर्क साधला व या घटनेची माहिती दिली.
समुद्रावरून जाताना संपर्कात येतात अडचणी
सुषमा स्वराज यांचे विमान शनिवारी संध्याकाळी चार वाजता त्रिवेंद्रमहून रवाना झाले होते. चेन्नई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षानेही पुन्हा त्यांच्या विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश येत नव्हते. एखादे विमान जेव्हा समुद्रावरून चाललेले असते त्यावेळी त्याच्याशी संपर्क राखण्यात काही वेळेस अडचणी निर्माण होतात. कारण तिथे रडार कव्हरेज नसते. कधी कधी विमान चालक मॉरिशसच्या हवाई हद्दीत शिरल्यानंतर तेथील हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यास विसरतात, असेही एएआयच्या सूत्रांनी सांगितले. ब्रिक्स देशांच्या होणा-या बैठकीसाठी तसेच भारत, ब्राझिल व दक्षिण आफ्रिका या देशांच्या मंत्र्यांमध्ये होणा-या चर्चेसाठी सुषमा स्वराज दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर आहेत. त्यासाठी शनिवारी केलेल्या प्रवासात इंधन भरण्यासाठी तसेच तांत्रिक गोष्टींसाठी त्यांचे विमान तीन ठिकाणी थांबले. त्यातील मॉरिशस येथे हे विमान तीन तास थांबले होते.
Authorities confirmed that External Affairs Minister Sushma Swaraj's VIP flight from Trivandrum to Mauritius went incommunicado for around 14 minutes, however, they insist that it would not comprise a 'mid air scare' .
— ANI Digital (@ani_digital) June 3, 2018
Read @ANI Story | https://t.co/yNxYCO6Vwdpic.twitter.com/BLj3fx9I1T