चिनी कंपन्यांची भारतातील थेट गुंतवणूक वेगाने घटली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2020 05:02 AM2020-09-20T05:02:24+5:302020-09-20T05:02:47+5:30
एफडीआय इन्फ्लो फिगर्सने ही माहिती उघड केली. त्यात म्हटले आहे की, भारतात चीनच्या कंपन्यांनी २०१७-२०१८ मध्ये ३५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली.
हरीश गुप्ता ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लडाखवरून भारत आणि चीन यांच्या संबंधांत मोठा तणाव निर्माण झालेला असला तरी चीनच्या कंपन्यांची भारतातील थेट विदेशी गुंतवणूक (एफडीआय) गेल्या तीन वर्षांत वेगाने खाली येत आहे.
एफडीआय इन्फ्लो फिगर्सने ही माहिती उघड केली. त्यात म्हटले आहे की, भारतात चीनच्या कंपन्यांनी २०१७-२०१८ मध्ये ३५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली. फक्त थेट विदेशी गुंतवणूकच कमी होत आहे असे नाही. भारतीय कंपन्यादेखील चीनमध्ये गेल्या तीन ते चार वर्षांत कमीकमीच गुंतवणूक करीत आहेत.
कोणत्याही चिनी कंपन्यांना भारतात गुंतवणुकीस परवानगी न देण्याचा सरकारचा विचार आहे का, अशी विचारणा लोकसभेत मंत्र्यांना करण्यात आल्यावर त्यांनी स्पष्टपणे ‘नाही’ असे उत्तर दिले. वाणिज्य, उद्योग व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी संसदेत दिलेल्या माहितीत म्हटले की, चीनसोबत भारताच्या व्यापारातील तूट ही एप्रिल-जून २०२०-२०२१ मध्ये ५.८ अब्ज डॉलर्स एवढी खाली आली. कारण ही तूट गेल्या वर्षी आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत १३.१ अब्ज डॉलर्सची होती. एवढेच काय दोन देशांतील एकूण व्यापार तूट आर्थिक वर्ष २०२१ च्या एप्रिल-जून या तिमाहीत १६.५५ अब्ज डॉलर्स एवढ्या मोठ्या प्रमाणात खाली आली. ही तूट २०१९-२०२० वर्षाच्या पहिल्या तिमाहीत २१.४२ अब्ज डॉलर्सची होती.
ही व्यापार तूट कमी करण्यासाठी चीनवर व्यापार प्रतिबंध घातले का? असे विचारल्यावर गोयल म्हणाले की, या क्षणाला सुमारे ५५० उत्पादने ही विदेश व्यापार धोरणाअंतर्गत फक्त चीनच नव्हे, तर सगळ्या देशांकडून आयातीसाठी प्रतिबंधित/निर्बंधित वर्गातील आहेत. त्यामुळे बंदी ही फक्त चीनपुरतीच नाही. अन्य देशांचाही या बंदीत समावेश असून याबाबत अधिक विचारविनिमय सुरू आहे.
चीनमधून गुंतवणुकीचा ओघ
वर्ष २०१७-२०१८ २०१८-२०१९ २०१९-२०२०
दशलक्ष डॉलर्स ३५०.२२ २२९.० १६३.७७
भारतातून चीनमध्ये झालेली गुंतवणूक (आॅगस्ट २०२० पर्यंतची आकडेवारी)
वर्ष २०१७ २०१८ २०१९ २०२०
दशलक्ष डॉलर्स ४९.१९ १२.६१ २७.५७ २०.६३