स्वयंसेवी संस्थांना १३,०५१ कोटींच्या विदेशी देणग्या
By admin | Published: December 3, 2015 03:00 AM2015-12-03T03:00:29+5:302015-12-03T03:00:29+5:30
देशातील १७,६१६ स्वयंसेवी संस्थांना इ.स.२०१३-१४ या वर्षात १३,०५१ कोटी रुपयांच्या विदेशी देणग्या प्राप्त झाल्या असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे बुधवारी देण्यात आली.
नवी दिल्ली : देशातील १७,६१६ स्वयंसेवी संस्थांना इ.स.२०१३-१४ या वर्षात १३,०५१ कोटी रुपयांच्या विदेशी देणग्या प्राप्त झाल्या असल्याची माहिती केंद्र सरकारतर्फे बुधवारी देण्यात आली.
गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लिखित उत्तरात सांगितले की, २०१२-१३ या वर्षात २०,४९७ स्वयंसेवी संघटनांना ११,५२७ कोटी रुपयांच्या विदेशी देणग्या मिळाल्या होत्या, तर २०११-१२ दरम्यान २२,७४७ स्वयंसेवी संघटनांना ११,५५८ कोटी रुपयांचे विदेशी अनुदान मिळाले. स्वयंसेवी संघटनांना विदेशी देणगी स्वीकारण्यासाठी एफसीआरए २०१०, अंतर्गत नोंदणी अथवा पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. याशिवाय मंजुरीप्राप्त संघटनांनी या विदेशी देणग्यांबाबत आर्थिक वर्षाच्या आधारे केंद्र सरकारला वार्षिक विवरण देणे बंधनकारक असल्याचेही रिजिजू यांनी स्पष्ट केले.
दाढीची मुभा देण्याचा विचार
राष्ट्रीय कॅडेट कोरमध्ये (एनसीसी) शीख समुदायाप्रमाणेच मुस्लिम विद्यार्थ्यांनाही दाढी ठेवण्याची सवलत देण्यासंदर्भातील शिफारस सरकारच्या विचाराधीन आहे, असे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
(लोकमत न्यूज नेटवर्क)
बुधवारी राज्यसभेत एका उत्तरात ही माहिती दिली. मुस्लिम विद्यार्थ्यांना दाढी ठेवल्याच्या कारणावरून एनसीसीत प्रवेश नाकारल्याच्या तक्रारी आंध्र प्रदेश राज्य अल्पसंख्याक आयोगाला मिळाल्या आहेत.
घुसखोरीच्या घटनेत घट
अलीकडील काही वर्षांत सीमेपलीकडून घुसखोरीच्या घटना कमी झाल्या आहेत, अशी माहिती चौधरी यांनी दिली. घुसखोरीची समस्या हाताळण्यासोबतच सीमा क्षेत्रातील सुरक्षा वाढविण्याकरिता केंद्र सरकारने संबंधित राज्य सरकारांच्या सहकार्याने उपाययोजना केल्या आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)