विदेशमंत्री जयशंकर अधिकृतरित्या भाजपमध्ये सामील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2019 05:53 PM2019-06-24T17:53:08+5:302019-06-24T17:53:31+5:30
भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत विदेशमंत्री जयशंकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर विदेश मंत्रालयाची जबाबदारी आहे.
नवी दिल्ली - विदेश सचिव ते विदेश मंत्री असा आश्चर्यकारक प्रवास करणारे केंद्रीयमंत्री सुब्रमण्यम जयशंकर यांनी आज अधिकृतरित्या भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांचा भाजप प्रवेश केवळ औपचारिकता होती. मोदी सरकारमध्ये त्यांना विदेश मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजपमध्ये सामील होणे अपरिहार्यच होते.
सोमवारी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत विदेशमंत्री जयशंकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर विदेश मंत्रालयाची जबाबदारी आहे. याआधीच्या मोदी सरकारमध्ये सुषमा स्वराज यांच्याकडे विदेशमंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती. स्वराज यांनी यावेळी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला होता.
Delhi: External Affairs Minister Subrahmanyam Jaishankar formally joined BJP today in presence of Working President J.P. Nadda, at Parliament House. pic.twitter.com/lyD2Ph05rU
— ANI (@ANI) June 24, 2019
देशातील महत्त्वपूर्ण राजकीय रणनितीकार के. सुब्रमण्यम यांचे चिरंजीव असलेले जयशंकर पंतप्रधान मोदींचे निकटवर्तीय मानले जातात. पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत देशाची रणनिती आखण्यासाठी जयशंकर असतात. राजकीय जाणकारांच्या मते, जयशंकर यांची काम करण्याची पद्धत पंतप्रधान नरेंद्र मोदींना जोखीम घेण्यास फायदेशीर ठरते.
जयशंकर १९७७ च्या बॅचचे आयएफएस अधिकारी आहेत. त्यांना अनुशक्ती, अमेरिका आणि चीनसोबतच्या संबंधावर चांगला अनुभव आहे. त्यांनी २००८ मध्ये भारत-अमेरिका असैन्य अनुशक्ती संदर्भातील चर्चेत महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती.