विदेशवारी करणाऱ्यांना भरावा लागेल आयकर रिटर्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 05:13 AM2019-07-08T05:13:08+5:302019-07-08T05:14:03+5:30
बजेटमध्ये प्रस्ताव : वार्षिक १ लाख वीजबिल भरणाऱ्यांनाही अनिवार्य
नवी दिल्ली : आपण जर विदेश दौºयावर दोन लाखांपेक्षा अधिक खर्च केला असेल किंवा आपले वीज बिल वर्षात एक लाखांपेक्षा अधिक असेल अथवा आपण वर्षभरात बँकेत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली असेल, तर भलेही आपले उत्पन्न वार्षिक पाच लाखांपेक्षा कमी असेल, तरीही आपल्यासाठी आयकर रिटर्न दाखल करणे अनिवार्य असेल. २०१९- २० च्या बजेटमध्ये हा प्रस्ताव मांडण्यात आला आहे.
या तीन प्रस्तावांनुसार, जर त्या व्यक्तीचे वार्षिक करपात्र उत्पन्न पाच लाखांपेक्षा कमी असेल, तरी त्या व्यक्तीला आयकर विवरण देणे अनिवार्य असणार आहे. आयकर अधिनियमाच्या कलम ५४ नुसार दीर्घकालीन भांडवली लाभावर कर सूट देण्याचा दावा करणाºया व्यक्तींनाही आयकर विवरण देणे अनिवार्य असेल. सध्या अशा प्रकारचे लाभ घर, बाँड यासारख्या संपत्तीत गुंतवणुकीवर आयकरातून सूटच्या स्वरूपात मिळतात. यासाठी आयकर विवरण दाखल करावे लागत नाही. या सर्व दुरुस्त्या १ एप्रिल, २०२० पासून लागू असतील आणि २०२०-२१ आणि त्यानंतरच्या मूल्यांकन वर्षांपासून अंमलबजावणी होईल.
देशातील नगदी देवाणघेवाण मर्यादित करण्यासाठी आयकर अधिनियमामध्ये एक नवे कलम १९४ एन जोडण्याचा प्रस्ताव आहे. यानुसार, एखाद्या व्यक्तीने बँकेत अथवा सहकारी बँकेत किंवा पोस्ट आॅफिसमध्ये वर्षभर एक कोटी रुपयांपेक्षा अधिक नगदी रक्कम काढून घेतली, तर दोन टक्के दराने यावर कपात करण्याचा प्रस्ताव आहे. ही तरतूद सरकार, बँकिंग कंपनी, बँकिंग कार्यातील सहकारी समिती, पोस्ट आॅफिस, बँकिंग प्रतिनिधी आणि व्हाइट लेबल एटीएम संचलन करणाºया युनिटसाठी लागू असणार नाही. कारण व्यवसायानिमित्त त्यांना मोठ्या प्रमाणात नगदी रकमेचा वापर करावा लागतो.
अधिक रक्कम खात्यात जमा केली तर...
बजेटसोबत प्रस्तुत अर्थ विधेयकात आयकर अधिनियमाच्या कलम १३९ मध्ये काही दुरुस्ती प्रस्ताव आहेत. या अंतर्गत निश्चित रकमेपेक्षा अधिक रकमेची देवाणघेवाण केल्यास आयकर रिटर्न दाखल करणे अनिवार्य असणार आहे. यानुसार, जर एखादी व्यक्ती एक वर्षात एखाद्या बँकिंग कंपनी अथवा सहकारी बँकेत एका किंवा त्यापेक्षा अधिक चालू खात्यात एकूण एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करत असेल, तर त्या व्यक्तीला आयकर विवरण देणे अनिवार्य असणार आहे.
एखादी व्यक्ती स्वत:च्या किंवा अन्य व्यक्तीच्या विदेश यात्रेवर एकूण दोन लाखांपेक्षा अधिकचा खर्च करत असेल, तर त्यांना आयकर विवरण द्यावे लागेल.
याशिवाय, एखाद्या व्यक्तीचे वार्षिक वीजबिल एकूण एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल, तर त्या व्यक्तीला आयकर रिटर्न दाखल करावा लागेल.