या पठ्ठ्याने १,३६0 एकरमध्ये निर्माण केले जंगल
By admin | Published: May 15, 2017 12:06 AM2017-05-15T00:06:36+5:302017-05-15T00:06:36+5:30
जंगले वाचविण्याची चिंता सरकारला सतावत असते. विकासाच्या नावावर जंगलतोड मात्र सुरूच आहे. अशा या विचित्र परिस्थितीत एक व्यक्ती अशीही आहे
दिसपूर : जंगले वाचविण्याची चिंता सरकारला सतावत असते. विकासाच्या नावावर जंगलतोड मात्र सुरूच आहे. अशा या विचित्र परिस्थितीत एक व्यक्ती अशीही आहे, ज्याने खडकाळ, बरड जमिनीवर हिरवेगार जंगल निर्माण केले आहे. त्याच्या प्रयत्नांनी थोड्या थोडक्या नव्हे तब्बल १,३६० एकरवर विशाल आणि घनदाट जंगल उभे राहिले आहे. जादव मोलाई पायेंग असे या अवलियाचे नाव आहे. ३७ वर्षांपूर्वी जादव यांनी आपल्या अद्भुत वृक्षारोपणास सुरुवात केली. आसामच्या जोरहाट जिल्ह्याच्या रानावनातील प्रदेशात राहणारे जादव तेव्हा १६ वर्षांचे होते. ब्रह्मपुत्रेला येणाऱ्या भयंकर पुरामुळे जमिनीवरची माती, झाडे सगळे वाहून जातात. हळूहळू हा परिसर बरड आणि ओसाड झाला. पशु-पक्षी दिसेनासे झाले. पशु-पक्ष्यांचा लळा असलेले जादव त्यामुळे अस्वस्थ झाले. त्यांनी वस्तीवरील ज्येष्ठांकडे विचारणा केली. ज्येष्ठांनी सांगितले की, झाडेझुडपे नसल्याने प्राणी संपले आहेत. झाडे लावण्याची विनंती करण्यासाठी जादव मग सरकारकडे गेले, पण त्यांना कोणीच दाद दिली नाही. मग त्यांनी स्वत:च झाडे लावण्याचा संकल्प केला. गेली ३७ वर्षे ते रोज झाडे लावत आहेत. त्यांनी मोठ्या प्रमाणात बांबूची लागवड केली. त्यांच्या या मोहिमेमुळे १,३६० एकर जमीन हिरवीगार झाली आहे. सरकारच्या सेंट्रल पार्क जंगलाचे क्षेत्र फक्त ७७८ एकर आहे. यावरून जादव यांच्या कार्याची कल्पना यावी. जादव यांनी वाढविलेल्या जंगलात आता शेकडो हरणे, हजारो पक्षी तसेच वाघांसारखे शिकारी प्राणी आहेत. ११५ हत्तींचा एक कळप दरवर्षी त्यांच्या जंगलात येतो. सहा महिने राहून पिलांना जन्म देतो. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने २०१५ मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित केले. त्यांनी लावलेले जंगल त्यांच्याच नावाने ‘मोलाई फॉरेस्ट’ म्हणून ओळखले जाते.