फोटो काढण्यासाठी गाडीतून उतरलेल्या व्यक्तीला हत्तीने चिरडून केलं ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2017 01:58 PM2017-11-24T13:58:11+5:302017-11-24T15:33:47+5:30
उत्तर बंगालमध्ये अशाच प्रकारे हत्तीचा फोटो काढण्यासाठी गाडीतून उतरलेल्या व्यक्तीला हत्तीने चिरडून ठार केल्याची घटना समोर आली आहे. जलपैगु़डी जिल्ह्यातील लतागौरी जंगल परिसरात ही घटना घडली आहे.
कोलकाता - जंगलात सफारी करताना गाडीतून उतरणे धोकादायक असते, त्यामुळेच पर्यटकांना गाडीतून न उतरण्याची सूचना असते. पण अनेकदा पर्यटक सुचनांकडे दुर्लक्ष करत प्राण्यांना जवळून पाहण्याच्या मोहापायी गाडीतून उतरत जीव धोक्यात घालताना दिसतात. उत्तर बंगालमध्ये अशाच प्रकारे हत्तीचा फोटो काढण्यासाठी गाडीतून उतरलेल्या व्यक्तीला हत्तीने चिरडून ठार केल्याची घटना समोर आली आहे. जलपैगु़डी जिल्ह्यातील लतागौरी जंगल परिसरात ही घटना घडली आहे. संध्याकाळी 5 वाजता ही घटना घडली. राष्ट्रीय महामार्ग 31 वर घडलेल्या या घटनेमुळे काळी काळासाठी वाहतूक ठप्प झालं होतं.
40 वर्षीय सादिक रहमान जलपैगुडी येथे एका बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. कामावर जात असताना त्यांनी आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आणि प्राण्यांचा फोटो काढण्यासाठी गाडीतून खाली उतरले. यावेळी हत्तीने त्यांच्यावर हल्ला केला. हत्तीचं रौद्र रुप पाहून उपस्थितांकडे समोर जे होतंय ते पाहण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नव्हता. जवळपास 15 मिनिटं हत्तीचा हौदोस सुरु होता. सादिक रहमान यांच्यावर हल्ला केल्यानंतर हत्ती जंगलात निघून गेला. हत्तीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सादिक रहमान यांचा जागीच मृत्यू झाला होता.
'या परिसरात हत्तींची संख्या जास्त आहे. ते नेहमीच दिसत असतात, त्यात काही नवीन नाही. तसं पहायला गेलं तर ते रोजच हायवे क्रॉस करत असतात. आणि त्यावेळी कोणीही आपल्या गाडीतून खाली उतरायचं नाही असा नियमच आहे. सादिक रहमानने हा नियम मोडला आणि त्याचा मृत्यू झाला', अशी माहिती वनअधिका-याने दिली आहे.
राज्याच्या वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, हत्तीच्या हल्ल्यात गतवर्षी 84 लोकांचा मृत्यू झाला होता. ट्रेनने धडक दिल्याने झालेल्या अपघातातही अनेक हत्तींचा मृत्यू झाला आहे.
आणखी वाचा : ...जेव्हा नाशिकमध्ये चक्क सायकलवर स्वार होतो ‘इंडियन कोब्रा’