२३ हजार रुपये दंडाचं काय घेऊन बसलात?; 'ही' पावती बघून डोळे फिरतील!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2019 06:48 PM2019-09-04T18:48:20+5:302019-09-04T18:49:53+5:30
मोटार वाहन कायद्यातील दुरुस्तीनंतर दंडाची रक्कम दुप्पट ते दहापट वाढवण्यात आलीय.
हरियाणात गुरुग्राममधील एका स्कूटी चालकाला मोटार वाहन कायद्यातील नव्या नियमांनुसार २३ हजार रुपयांचा दंड ठोठावल्याची घटना काल चर्चेत होती. स्कूटीचे आरसी, चालक परवाना, पीयूसी, विमा आदींपैकी एकही कागदपत्र नसल्यानं दिनेश मदान यांच्या नावे वाहतूक पोलिसांनी ही पावती फाडली होती. स्कूटीची किंमत १५ हजार रुपये आणि दंड २३ हजार रुपयांचा, या अजब गणितामुळे ही पावती गाजली. परंतु, त्यानंतर काही वेळातच, गुरुग्राम वाहतूक पोलिसांनीच फाडलेल्या एका दंडाच्या पावतीवरील आकडा अवाक् करणारा आहे.
गुरुग्राम वाहतूक पोलिसांनी मंगळवारी रात्री राम गोपाल नामक एका ट्रॅक्टर-ट्रॉली चालकाला अडवलं. न्यू कॉलनी परिसरात त्यानं एक सिग्नल तोडला होता आणि एका मोटारसायकलला धडक दिली होती. पोलिसांनी कागदपत्रं मागितली, तेव्हा त्याच्याकडे लायसन्स, आरसी, फिटनेस सर्टिफिकेट, इन्शूरन्स यापैकी काहीच नव्हतं. त्यासोबतच, ट्रॅफिक नियमांचं उल्लंघन त्यानं केलं होतं. वेगमर्यादा पाळली नव्हती आणि ट्रॅक्टर-ट्रॉलीत क्षमतेपेक्षा जास्त सामान भरलं होतं. या सगळ्या चुकांची शिक्षा म्हणून पोलिसांनी तब्बल ५९ हजार रुपये दंडाची पावती त्याच्या हातावर ठेवली. तो आकडा पाहून राम गोपालही हडबडला. कागदपत्रं सादर करण्यासाठी एक दिवसाची मुदत देण्याची विनंती त्यानं केली. त्यानंतर, बुधवारी दुपारी त्यानं काही कागदपत्रं पोलिसांना नेऊन दाखवली. आता त्याला १३ हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.
दरम्यान, गुरुग्राम वाहतूक पोलिसांनी २४ हजार आणि ३५ हजारांची पावतीही फाडली आहे.
नव्या नियमानुसार 23 हजारांचे चलन फाडले; स्कूटी मालकाने पोलिसांना असे काही सांगितले की....
१ सप्टेंबरपासून देशातील पाच राज्यं (महाराष्ट्रासह) वगळता अन्य राज्यांमध्ये दुरुस्त केलेला मोटार वाहन कायदा लागू झाला आहे. यामध्ये दंडाची रक्कम दुप्पट ते दहा पट वाढवण्यात आलीय. काही जण या नव्या नियमावलीचं स्वागत करत आहेत. नागरिकांना शिस्त लागण्यासाठी असा जबर दंडच गरजेचा असल्याचं त्यांचं मत आहे. तर, ही नियमावली म्हणजे अतिरेक असल्याचं काहींचं म्हणणं आहे.
आता हेल्मेट न घातल्यास रद्द होणार लायसन्स; जाणून घ्या ट्रॅफिकचे नवे 19 नियम
मोटार वाहन कायद्यातील दुरुस्तीनुसार दंड आकारणी महाराष्ट्रात अद्याप सुरू झालेली नाही. परंतु, दोन दिवसांत या संदर्भातील अधिसूचना जारी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, दंडाची नवीन रक्कम परिवहन विभागाच्या सॉफ्टवेअरमध्ये अपलोड केली जाईल आणि ई-दंड आकारणीला सुरुवात होईल.